ISL 2020-21: मुंबई सिटीस विजेतेपदाची प्रतीक्षा

 ISL 2020-21: मुंबई सिटीस विजेतेपदाची प्रतीक्षा
ISL 202021 Mumbai City awaits the title

पणजी : प्रगल्भ प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या मुंबई सिटी एफसीला आता विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. यापूर्वी दोन वेळा उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलेल्या या संघाला पहिल्यांदाच करंडक जिंकण्याची संधी राहील.

स्पर्धेच्या अंतिम लढतीत शनिवारी  फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मुंबई सिटीसमोर मातब्बर एटीके मोहन बागान संघाचे आव्हान असेल. मुंबई सिटीने प्ले-ऑफ (उपांत्य) फेरीत पेनल्टी शूटआऊटवर एफसी गोवास 6-5 फरकाने नमविले. पहिल्या टप्प्यात 2-2 गोलबरोबरी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात अतिरिक्त वेळेतही गोलशून्य बरोबरी कायम राहिली.

मुंबई सिटीने यापूर्वी दोन वेळा उपांत्य फेरी गाठली होती. 2016 साली त्यांना एटीके संघाने नमविले. पहिल्या टप्प्यात 3-2 अशा फरकाने एटीकेने बाजी मारल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. मुंबई सिटीने 2018-19 मोसमात दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत गाठली, पण एफसी गोवा संघ त्यांना भारी ठरला. मुंबईत एफसी गोवाने 5-1 फरकाने दणदणीत विजय मिळविला, दुसऱ्या टप्प्यात गोव्यात मुंबईचा संघ 1-0 फरकाने जिंकला, पण 5-2 गोलसरासरीवर एफसी गोवा संघ अंतिम फेरीत दाखल झाला.

दुहेरी यशाची संधी

मुंबई सिटी एफसीने साखळी फेरीत अव्वल राहत लीग विनर्स शिल्डचा मान मिळविता, त्यामुळे हा संघ पुढील मोसमातील आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आता आयएसएल करंडकही जिंकल्यास त्यांना मोसमात दुहेरी यश साजरे करता येईल. खरं म्हणजे एटीके मोहन बागानला लीग विनर्स शिल्ड पटकावण्याची संधी होती, मात्र मुंबई सिटीने अखेरच्या दोन साखळी लढतीत जोरदार मुसंडी मारली. ओडिशा एफसीला 6-1 फरकाने, तर शेवटच्या साखळी लढतीत एटीके मोहन बागानला 2-0 फरकाने हरवून अग्रस्थान मिळविले. मुंबई सिटीने यंदा स्पर्धेत सर्वाधिक 37 गोल नोंदविले आहेत.

लोबेरा यांची छाप

मुंबई सिटीचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने सर्जिओ लोबेरा यांनी छाप पाडली. हे 44 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक पूर्वी एफसी गोवाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवास 2018-19 मोसमात आयएसएल करंडक थोडक्यात हुकला. अंतिम लढतीत त्यांना बंगळूर एफसीकडून निसटती हार पत्करावी लागली, पण लोबेरा यांच्या एफसी गोवाने 2019 मध्ये सुपर कप जिंकण्याची किमया साधली. एफसी गोवाने 2019-20 मोसमात लीग विनर्स शिल्डचा मान मिळविला, त्या मोसमाच्या अंतिम टप्प्यात लोबेरा यांना डच्चू मिळाला, पण एफसी गोवाच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. 2020-21 मोसमाच्या सुरवातीस त्यांनी मुंबई सिटीचे प्रशिक्षकपद स्वीकारले, सोबत त्यांनी एफसी गोवा संघात सफल ठरलेल्या मुर्तदा फॉल, अहमद जाहू, ह्युगो बुमूस, मंदार राव देसाई या खेळाडूंना मुंबई सिटी संघात आणले. केरळा ब्लास्टर्सतर्फे यशस्वी ठरलेला बार्थोलोमेव ओगबेचे यालाही मुंबई सिटी संघात स्थान मिळाले. अष्टपैलू संघाची उभारणी झाल्याने मुंबई सिटीने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com