ISL 2020-21: मुंबई सिटी लीग विनर्स शिल्डला मुकणार?

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

मुंबई सिटीची लढत शनिवारी वास्को येथील टिळक मैदानावर जमशेदपूर एफसीविरुद्ध होणार आहे.

पणजी : मुंबई सिटीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बराच काळ अग्रस्थान राखले, पण मागील पाच लढतीत कामगिरी काही प्रमाणात घसरल्यामुळे त्यांना दुसऱ्या स्थानी जावे लागले. पुन्हा अव्वल स्थान मिळविले नाही, तर त्यांना यावेळच्या स्पर्धेतील लीग विनर्स शिल्डला आणि परिणामी एएफसी चँपियन्स लीग पात्रतेलाही मुकावे लागू शकते.

मुंबई सिटीची लढत शनिवारी वास्को येथील टिळक मैदानावर जमशेदपूर एफसीविरुद्ध होणार आहे. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीचे सध्या 34 गुण आहेत, मागील पाच लढतीपैकी दोन लढतीत पराभव आणि दोन बरोबरी यामुळे त्यांना महत्त्वाच्या गुणांना मुकावे लागले आहे. प्ले-ऑफ फेरी निश्चित झालेली आहे, पण अव्वल स्थानासाठी त्यांना एटीके मोहन बागानशी संघर्ष करावा लागत आहे. सध्या दोन गुणांनी मागे असल्याने मुंबई सिटीसाठी बाकी तिन्ही सामने निर्णायक आहेत. मागील लढतीत त्यांना बंगळूर एफसीकडून 2-4 फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता मुंबई सिटीच्या बचावाबाबत संशय व्यक्त होऊ लागला आहे.

ISL 2020-21: मुंबई सिटीच्या बुमूसवरील कारवाईत वाढ

जमशेदपूर एफसीचे आव्हान अधांतरी आहे.अगोदरच्या लढतीत एटीके मोहन बागानकडून हार स्वीकारावी लागल्याने त्यांच्या प्ले-ऑफ फेरीला धक्का बसला. त्यांचे सध्या 21 गुण आहेत. प्रतिष्ठेच्या दृष्टीनेच ते मुंबई सिटीला आव्हान देतील. सुरवातीच्या धडाक्यानंतर त्यांचा हुकमी आघाडीपटू नेरियूस व्हाल्सकिस (आठ गोल) याला गोल नोंदविण्यात अपयश आले आहे. त्यामुळे जमशेदपूरच्या कामगिरीवरही प्रतिकुल परिणाम झाला. जमशेदपूरने उसळी घेत चकीत करणारा निकाल नोंदविल्यास मुंबई सिटीला जबर धक्का बसेल.

दृष्टिक्षेपात...

- मुंबई सिटीची कामगिरी ः 17 सामने, 10 विजय, 4 बरोबरी, 3 पराभव, 34 गुण

- जमशेदपूर एफसीची कामगिरी ः 18 सामने, 5 विजय, 6 बरोबरी, 7 पराभव, 21 गुण

- मुंबई सिटीचे 27, तर जमशेदपूरचे 16 गोल

- मुंबई सिटीच्या एडम ली फाँड्र याचे 11 गोल

- स्पर्धेत मुंबई सिटीच्या 8, तर जमशेदपूरच्या 7 क्लीन शीट्स

- पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे 1-1 गोलबरोबरी

संबंधित बातम्या