ISL 2020-21: मुंबई सिटीस खुणावतोय करंडक; आयएसएल विजेतेपदासाठी एटीके मोहन बागानचे कडवे

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीस आता विजेतेपदाचा करंडक खुणावत आहे, पण आव्हान सोपे नाही.

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात साखळी फेरीत अव्वल राहून लीग विनर्स शिल्ड पटकावल्यानंतर आता सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीस आता विजेतेपदाचा करंडक खुणावत आहे, पण आव्हान सोपे नाही. जिंकण्यासाठी त्यांना स्पेनचेच अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील कोलकात्याच्या एटीके मोहन बागान संघाचा पाडाव करावा लागेल. मुंबई सिटी व एटीके मोहन बागान यांच्यातील अंतिम सामना शनिवारी  फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर स्पर्धेच्या इतिहासातील ही तिसरी अंतिम लढत असेल.

हबास यांनी यापूर्वी आयएसल करंडक विजेतेपदाचा जल्लोष केला आहे. कोलकात्यातील एटीके संघाचे प्रशिक्षक या नात्याने त्यांनी 2014 व 2019-20 मध्ये आयएसएल स्पर्धा जिंकली. एटीके संघ एकूण तीन वेळा या स्पर्धेत विजेता ठरला आणि आता मोहन बागान संघाचे विलनीकरण झाल्यानंतर हा संघ आणखी एका अंतिम लढतीत खेळत आहे. एफसी गोवाचे प्रशिक्षक असताना सर्जिओ लोबेरा यांना आयएसएल करंडकाने थोडक्यात हुलकावणी दिली. 2018-19 मधील अंतिम लढतीत बंगळूर एफसीने गोव्याच्या संघात निसटते हरविले होते. लोबेरा यांना आता त्या अपयशाची भरपाई करण्याची संधी लाभत आहे.

दमदार कामगिरी

यंदाच्या आयएसएल स्पर्धेत मुंबई सिटी, तसेच एटीके मोहन बागानने दमदार कामगिरी बजावत अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत प्रत्येकी 40 गुण नोंदविले, मात्र एकमेकांविरुद्धच्या लढतीतील विजय आणि सरस गोलसरासरी यामुळे मुंबई सिटी संघ अव्वल ठरला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने शनिवारी अंतिम लढतीत कडवी झुंज अपेक्षित आहे. साखळी फेरीतील दोन्ही लढतीत मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला हरविले, त्यापैकी शेवटच्या साखळी लढतीत विजय प्राप्त केल्याने मुंबई सिटीस एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठीही थेट पात्रता मिळविता आली. उपांत्य लढतीत एफसी गोवाने पहिल्या टप्प्यात 2-2 गोलबरोबरीत रोखल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त वेळेतही गोलशून्य बरोबरी झाली. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटवर 6-5 फरकाने विजय नोंदवत मुंबई सिटी संघ प्रथमच अंतिम फेरीत दाखल झाला. एटीके मोहन बागानला उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात नॉर्थईस्ट युनायटेडने 1-1 गोलबरोबरीत रोखले, मात्र दुसऱ्या लढतीत 2-1 फरकाने विजय नोंदवत त्यांनी अंतिम फेरीतील जागा 3-2 गोलसरासरीसह पक्की केली.

सर्वोत्तम पुरस्कारासाठी चुरस

स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूच्या गोल्डन बूटसाठी चुरस आहे. एटीके मोहन बागानचा फिजीयन रॉय कृष्णा व एफसी गोवाचा स्पॅनिश इगोर आंगुलो यांनी समान 14 गोल केले आहेत. पुरस्कार जिंकण्यासाठी कृष्णा याला अंतिम लढतीत गोल नोंदवावा लागेल, कारण तो  स्पर्धेत जास्त मिनिटे खेळला असल्याने पुरस्कारासाठी आंगुलोचे पारडे जड ठरेल. कृष्णाने गतमोसमातही संयुक्त अव्वल ठरताना 15 गोल केले होते, पण नेरियूस व्हाल्सकिस याची कामगिरी सरस ठरल्याने कृष्णाला गोल्डन बूट मिळाला नव्हता.

त्याचवेळी सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाच्या गोल्डन ग्लोव्ह पुरस्कारासाठीही चढाओढ आहे. मुंबई सिटीचा कर्णधार अमरिंदर सिंग आणि एटीके मोहन बागानचा अरिंदम भट्टाचार्ज यांनी स्पर्धेत प्रत्येकी 10 क्लीन शीट्स राखल्या आहेत. अरिंदमने कमी गोल स्वीकारले असल्याने त्याचे नाव सध्या आघाडीवर आहे.

विजेतेपदाचे लक्ष्य

एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हबास यांनी विजेतेपदाचे लक्ष्य बाळगले आहे. साखळी फेरीत आपला संघ मुंबई सिटीविरुद्ध दोन वेळा पराभूत झाला, तरी त्यास ते कमी महत्त्व देत आहेत. ``आम्हाला सामन्याचे विश्लेषण करून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळावर नियंत्रण राखण्याऐवजी विजयी संधी साधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जिंकणे हेच नियोजन असून विजयासाठीच माझा संघ तयार आहे,`` असे हबास यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

``एटीके मोहन बागान संघ तुल्यबळ असून त्यांच्यापाशी चांगले खेळाडू आहेत, तरीही आम्ही स्वतःच्या कामगिरीवर पूर्ण लक्ष एकवटले आहे. आमच्या शैलीवर आम्हाला 100 टक्के मेहतन घ्यायची आहे,`` असे मुंबई सिटीचे प्रशिक्षक लोबेरा यांनी नमूद केले. निलंबनामुळे मुंबईच्या संघात अंतिम लढतीत अनुभवी मंदार राव देसाईची अनुपस्थिती जाणवेल.

दृष्टिक्षेपात....

- यंदा साखळी फेरीत मुंबई सिटीची एटीके मोहन बागानवर अनुक्रमे 1-0 व 2-0 फरकाने मात

- स्पर्धेत मुंबई सिटीचे सर्वाधिक 37 गोल, एटीके मोहन बागानचे 31 गोल

- एटीके मोहन बागानचे 22 लढतीत 13 विजय, मुंबई सिटीने 12 सामने जिंकले

- दोन्ही संघांचे स्पर्धेत प्रत्येकी 4 पराभव

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाचे 14, मनवीर सिंगचे 6, तर डेव्हिड विल्यम्सचे 5 गोल

- मुंबई सिटीच्या अॅडम ली फाँड्र याचे 11, बार्थोलोमेव ओगबेचे याचे 8, तर बिपिन सिंगचे 5 गोल

- स्पर्धेत आतापर्यंत 114 सामन्यांत 2.59च्या सरासरीने 295 गोल

संबंधित बातम्या