ISL 2020-21: मुंबई सिटीस पराभवाचा जबर हादरा; बदली खेळाडूंच्या गोलमुळे जमशेदपूरचा सनसनाटी विजय

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

मुंबई सिटीचा हा सलग दुसरा, तर 18 सामन्यातील त्यांचा हा चौथा पराभव ठरला.

पणजी : जमशेदपूर एफसीचे बदली खेळाडू बोरिस सिंग व स्पॅनिश डेव्हिड ग्रांडे यांनी नोंदविलेल्या गोलमुळे शनिवारी सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदविला. त्यांनी मुंबई सिटीस 2-0 फरकाने पराभवाचा जबर हादरा दिला, त्यामुळे सर्जिओ लोबेरा यांच्या संघाच्या लीग विनर्स शिल्ड पटकाविण्याच्या लक्ष्यास झटकाही बसला.

सामना शनिवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. मुंबई सिटीचा हा सलग दुसरा, तर 18 सामन्यातील त्यांचा हा चौथा पराभव ठरला. त्यांचे 34 गुण व दुसरा क्रमांक कायम राहिला आहे. एटीके मोहन बागानचे 18 लढतीनंतर सर्वाधिक 39 गुण आहेत. कोलकात्याचा संघ पाच गुणांनी आघाडीवर असल्याने आता मुंबई सिटीसाठी लीग विनर्स शिल्डसह एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्रता मिळविण्याती वाटचाल खडतर बनली आहे. जमशेदपूरच्या बोरिस याने 72व्या, तर ग्रांडे याने 90+1व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे जमशेदपूरने सहावा विजय नोंदविला. त्यांचे आता 19 लढतीनंतर 24 गुण असून सहावा क्रमांक मिळाला आहे. फक्त एक सामना बाकी असल्यामुळे त्यांना प्ले-ऑफ संधी नसेल.

ISL 2020-21: प्ले-ऑफसाठी एफसी गोवा आणि बंगळूरसाठी महत्त्वाचा सामना

सामन्याचा पूर्वार्ध मुंबई सिटीसाठी अपेक्षित ठरला नाही. जमशेदपूर एफसीने त्यांना आक्रमणाची संधी लाभणार नाही याची दक्षता घेत प्रशिक्षक ओवेन कॉयल यांची व्यूहरचना योग्यपणे राबविली. त्याचवेळी जमशेदपूरने मुंबई सिटीच्या बचावफळीवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. बदली खेळाडू बोरिस सिंग याने उत्तरार्धातील कुलिंग ब्रेकला तीन मिनिटे बाकी असताना गोलरेषेच्या अगदी जवळून मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याला चकवा दिला. ऐतॉर मॉनरॉय याच्या सेटपिसेस फटक्यावर फारुख चौधरीचा नेम गोलरक्षक अमरिंदरने रोखला. त्यानंतर बोरिसने चेंडू गोलरक्षकाच्या ताब्यात नसल्याची संधी साधली. 21 वर्षीय बोरिसचा हा आयएसएलमधील दुसऱ्याच सामन्यातील पहिलाच गोल ठरला. तो 68व्या मिनिटास सैमिन्लेन डौंगेल याच्या जागी मैदानात उतरला होता.

इंज्युरी टाईममधील पहिल्याच मिनिटास जमशेदपूरने मुंबई सिटीस आणखी एक धक्का दिला. बदली खेळाडू स्पॅनिश डेव्हिड ग्रांडे याने ऐतॉर मॉनरॉय याच्या असिस्टवर चेंडूला अचूक दिशा दाखविताना चेंडूस अचूक दिशा दाखविली. नेरियूस व्हाल्सकिस याची जागा ग्रांडे याने 84व्या मिनिटास घेतली होती.

दृष्टिक्षेपात...

- बोरिस सिंग याचा दुसराच आयएसएल सामना, 1 गोल

- डेव्हिड ग्रांडे याचे मोसमातील 5 लढतीत 2 गोल, एकंदरीत 13 आयएसएल लढतीत 3 गोल

- जमशेदपूर एफसीच्या स्पर्धेत 8 क्लीन शीट्स

- मुंबई सिटीचे सलग 2 पराभव, 5 लढतीत फक्त 4 गुण

- पहिल्या टप्प्यात जमशेदपूर – मुंबई सिटी सामना 2-2 बरोबरीत

संबंधित बातम्या