ISL 2020-21:ओडिशाची ईस्ट बंगालवर 6-5 फरकाने मात

ISL 2020-21:ओडिशाची ईस्ट बंगालवर 6-5 फरकाने मात
ISL 202021 Odisha beat East Bengal 65

पणजी : ओडिशा एफसी व ईस्ट बंगाल यांच्यात सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सामना केवळ औपचारिकता होता, पण गोलांचा पाऊस पडल्यामुळे लढत विक्रमी ठरली. तब्बल 11 गोल झालेल्या लढतीत भुवनेश्वर येथील संघाने 6-5 फरकाने माजी मारली. सामना शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. ओडिशाला स्पर्धेतील अवघा दुसरा विजय मिळवून देताना 21 वर्षीय पॉल रामफांगझौव्हा याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 49 व 66व्या मिनिटास गोल करून आयएसएलमध्ये वैयक्तिक गोलखाते उघडले. याशिवाय 23 वर्षीय जेरी माविमिंगथांगा यानेही दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 51 व 67व्या मिनिटास लक्ष्य साधले. एस. लाल्हरेझुआला याने 33व्या मिनिटास, तर ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याने 69व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. मॉरिसियोचा हा स्पर्धेतील 12वा गोल ठरला.

ईस्ट बंगालसाठी वेल्सचा एरॉन हॉलॉवे (एमॅडी) याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 60 व 90+5व्या मिनिटास चेंडूस अचूक दिशा दाखविली. याशिवाय आयर्लंडच्या अँथनी पिल्किंग्टन याने २४व्या, जेजे लालपेखलुआ याने 74व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. याशिवाय ओडिशाचा गोलरक्षक रवी कुमार याने 37व्या मिनिटास स्वयंगोल करून ईस्ट बंगालला मदत केली. सामन्याच्या पूर्वार्धात ईस्ट बंगाल संघ 2-1 फरकाने आघाडीवर होता. गेल्या मंगळवारी याच मैदानावर ओडिशाचा मुंबई सिटीने 6-1 फरकाने धुव्वा उडविला होता. ओडिशाने 20 लढतीत दुसरा विजय नोंदविताना गुणसंख्या 12वर नेली, पण स्पर्धेतील मोहीम तळाच्या अकराव्या क्रमांकावर त्यांना संपवावी लागली. त्यांच्यावर स्पर्धेत सर्वाधिक 44 गोल स्वीकारण्याची नामुष्की आली. ईस्ट बंगालचा हा 20 लढतीतील नववा पराभव ठरला. त्यामुळे स्पर्धेतील पदार्पणाच्या मोसमात 17 गुणांसह नवव्या क्रमांकावर राहावे लागले.

पूर्वार्धातील तिन्ही गोल तेरा मिनिटांच्या फरकाने झाले. अँथनी पिल्किंग्टन याने याने ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. कुलिंग ब्रेकनंतरच्या तिसऱ्या मिनिटास एस. लाल्हरेझुआला याने ओडिशाला बरोबरी साधून दिली. हा गोल सेटपिसेसवर झाला. ब्रॅडेन इनमन याच्या कॉर्नर किकवर चेंडू ईस्ट बंगालच्या जॅक मघोमा याला आपटून लाल्हरेझुआला याच्याकडे गेला. त्याने अगदी जवळून मारलेल्या फटक्यासमोर गोलरक्षक सुब्रत पॉल असाह्य ठरला. विश्रांतीस आठ मिनिटे बाकी असताना ओडिशाचा गोलरक्षक रवी कुमार याच्या स्वयंगोलमुळे ईस्ट बंगालला आघाडी मिळाली. ईस्ट बंगालच्या जॅक मघोमा याचा फटका रोखताना ओडिशा एफसीच्या बचावफळीत गोंधळ उडाला. चेंडू गोलरक्षक रवी याला आपटून नेटमध्ये गेला. उत्तरार्धाच्या सुरवातीस तीन मिनिटांत दोन गोल नोंदवून ओडिशाने अनपेक्षितपणे आघाडी घेतली. पॉल रामफांगझौव्हा याने बरोबरी साधून दिल्यानंतर जेरी माविमिंगथांगा याने भुवनेश्वरच्या संघाला आघाडी मिळवून दिली. दोन्ही वेळेस ओडिशाच्या आक्रमणासमोर ईस्ट बंगालचा बचाव बेसावध ठरला.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com