ISL 2020-21: नॉर्थईस्टची आगेकूच ईस्ट बंगाल रोखणार?

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

नॉर्थईस्टच्या आघाडी फळीतील पोर्तुगीज लुईस माशादो व जमैकन देशॉर्न ब्राऊन यांनी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दणकेबाज खेळ केलेला आहे.

पणजी: अंतरिम प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत जबरदस्त आगेकूच राखली आहे. सध्या ते आठ सामने अपराजित आहेत, मात्र कोलकात्याच्या ईस्ट बंगालने चकीत केल्यास गुवाहाटीतील संघाला मोठा धक्का बसून प्ले-ऑफ फेरीतील जागाही संकटात येऊ शकते.

ईस्ट बंगाल आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी खेळला जाईल. नॉर्थईस्ट युनायटेडचे सध्या 27 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवापेक्षा तीन गुण कमी असून  ते सध्या पाचव्या क्रमांकावर आहेत. ईस्ट बंगालला नमविल्यास नॉर्थईस्टला अपराजित घोडदौड कायम राखत प्ले-ऑफचा दावा आणखीनच भक्कम करता येईल. धडाकेबाज खेळ करताना त्यांनी मागील आठ लढतीत 15 गोल नोंदविले आहेत.

ISL 2020-21 : एटीके मोहन बागान एक पाऊल दूर

ईस्ट बंगालने 17 गुणांची कमाई केली आहे. मागील कोलकाता डर्बीत एटीके मोहन बागानकडून पराजित झाल्यानंतर त्यांच्यासाठी बाकी दोन्ही लढती प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. हा संघ सध्या नवव्या क्रमांकावर आहे. कमाल सहा गुण मिळाल्यास त्यांना स्पर्धेतील पदार्पणात गुणतक्त्यातील स्थितीही सुधारता येईल. मात्र नॉर्थईस्ट संघ मातब्बर असल्याने आव्हान सोपे नसेल. नॉर्थईस्टच्या आघाडी फळीतील पोर्तुगीज लुईस माशादो व जमैकन देशॉर्न ब्राऊन यांनी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दणकेबाज खेळ केलेला आहे. मागील लढतीत पेनल्टी गोलमुळे पिछाडीवरून मुसंडी मारत नॉर्थईस्टने चेन्नईयीनला 3-3 असे गोलबरोबरीत रोखले होते.

ISL 2020-21 : पराभवामुळे माजी विजेत्या बंगळूरचे आव्हान संपुष्टात

दृष्टिक्षेपात...

- नॉर्थईस्ट युनायटेडची कामगिरी : 18 सामने, 6 विजय, 9 बरोबरी, 3 पराभव, 27 गुण

- ईस्ट बंगालची कामगिरी : 18 सामने, 3 विजय, 8 बरोबरी, 7 पराभव, 17 गुण

- पहिल्या टप्प्यात वास्को येथे नॉर्थईस्टचा ईस्ट बंगालवर 2-0 फरकाने विजय

- नॉर्थईस्टच्या 4, तर ईस्ट बंगालच्या 3 क्लीन शीट्स

- नॉर्थईस्टच्या लुईस माशादोचे 7 आणि देशॉर्न ब्राऊनचे 5 गोल

- नॉर्थईस्टचे 8 अपराजित लढतीत 4 विजय, 4 बरोबरी

संबंधित बातम्या