ISL 2021: सांतानामुळे हैदराबादला बरोबरीचा दिलासा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये हुकमी स्पॅनिश स्ट्रायकर आरिदाने सांताना याने नोंदविलेल्या गोलमुळे सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसीने पराभव टाळण्यास यश मिळविले.

पणजी: सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये हुकमी स्पॅनिश स्ट्रायकर आरिदाने सांताना याने नोंदविलेल्या गोलमुळे सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसीने पराभव टाळण्यास यश मिळविले. पिछाडीवरून त्यांनी ईस्ट बंगालला 1-1 गोलबरोबरीत रोखून गुणतक्त्यात तिसरा क्रमांक मिळविला आणि प्ले-ऑफ फेरीचा दावा कायम राखला.

सामना शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. ईस्ट बंगालचा 23 वर्षीय नायजेरियन स्ट्रायकर ब्राईट एनोबाखारे याने ५९व्या मिनिटास गोल केला. 90+2व्या मिनिटास सहकारी स्पॅनिश खेळाडू फ्रान सान्डाझा याच्या असिस्टवर आरिदाने सांताना याने देत हैदराबादला बरोबरी साधून दिली. त्यापूर्वी 82व्या मिनिटास ईस्ट बंगाल संघाला पेनल्टी फटका मिळू शकला नाही. इंज्युरी टाईममधील सातव्या मिनिटास हैदराबादच्या महंमद यासीर याला रेड कार्ड मिळाले.

हैदराबादची ही 17 लढतीतील नववी बरोबरी ठरली. त्यांचे आता 24 गुण झाले आहेत. तिसरा क्रमांक मिळविताना मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेडवर एका गुणाची आघाडी मिळविली आहे. ईस्ट बंगालची ही 17 लढतीतील आठवी बरोबरी ठरली. त्यांनी 17 गुणांसह नववा क्रमांक मिळविला आहे.

पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर नायजेरियन ब्राईट एनोबाखारे याने ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. तासाभराच्या खेळास एक मिनिट बाकी असताना ईस्ट बंगालला प्रतिहल्ल्यावर यश मिळाले. मध्यक्षेत्रात अँथनी पिल्किंग्टन याने हेडिंगद्वारे दिलेल्या चेंडूवर ताबा राखत एनोबाखारे याने जबरदस्त कौशल्य आणि वेग साधत मुसंडी मारली. त्याने हैदराबादच्या दोघा बचावपटूंना मागे टाकल्यानंतर जागा सोडून पुढे आलेला गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला चकवत चेंडूला नेटची अचूक दिशा दाखविली.

ईस्ट बंगालने आघाडी घेतल्यानंतर 73व्या मिनिटास बदली खेळाडू फ्रान सान्डाझा याचा गोल ऑफसाईड ठरल्यामुळे हैदराबादला बरोबरी साधणे शक्य झाले नाही. सामन्यातील आठ मिनिटे बाकी असताना हैदराबादच्या पेनल्टी क्षेत्रात एनोबाखारे याने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीच्या अडथळ्याने एनोबाखारे खाली पडला असता रेफरींनी पेनल्टी फटक्याची खूण केली नाही, त्यामुळे कोलकात्यातील संघाची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

पूर्वार्धातील खेळात ईस्ट बंगालचे वर्चस्व होते, पण त्यांना संधी गोलमध्ये रुपांतरीत करता आल्या नाही. हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीस खूपच दक्ष राहावे लागले. हैदराबादलाही गोल करण्याची संधी होती, पण त्यांच्या ज्योएल चियानेज याचा प्रयत्न ईस्ट बंगालचा अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉलने उधळून लावला. विश्रांतीस तीन मिनिटे असताना कट्टीमनीने अँथनी पिल्किंग्टनच्या फटक्यावर चेंडूचा अचूक अंदाज बांधला.

हा ठरला आयपीएल 2021च्या अंतिम लिलाव यादीतला सर्वात तरूण खेळाडू

 

दृष्टिक्षेपात...

  • - ईस्ट बंगालच्या ब्राईट एनोबाखारे याचे 10 सामन्यांत 3 गोल
  • - हैदराबादच्या आरिदाने सांताना याचे यंदा 16 सामन्यात 8 गोल
  • - सांतानाचे एकंदरीत 30 आयएसएल सामन्यांत 17 गोल
  • - हैदराबादच्या स्पर्धेत सर्वाधिक 9 बरोबरी
  • - स्पर्धेत हैदराबादचे 21, तर ईस्ट बंगालचे 15 गोल
  • - पहिल्या टप्प्यात हैदराबादची ईस्ट बंगालवर 3-2 फरकाने मात

संबंधित बातम्या