ISL:नॉर्थईस्टचा धडाका गोवा रोखणार? गुवाहाटीच्या संघाचे सलग तीन विजय, तर प्रतिस्पर्धी बरोबरीच्या फेऱ्यात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

नॉर्थईस्ट युनायटेड व एफसी गोवा या संघांची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सध्याची कामगिरी परस्परविरोधी आहे.

पणजी : नॉर्थईस्ट युनायटेड व एफसी गोवा या संघांची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सध्याची कामगिरी परस्परविरोधी आहे. गुवाहाटीच्या संघाने सलग तीन विजय नोंदवून धडाका राखला आहे, तर गोव्यातील संघ सलग बरोबरीच्या फेऱ्यात अडकला आहे. साहजिकच विजयी संघाचा झंझावात रोखण्यासाठी माजी उपविजेत्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागेल.

नॉर्थईस्ट युनायटेड व एफसी गोवा यांच्यातील सामना वास्को येथील टिळक मैदानावर गुरुवारी (ता. 4) खेळला जाईल. हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघ सात सामने अपराजित आहे, त्यापैकी तीन सलग बरोबरी आहेत. एटीके मोहन बागान, केरळा ब्लास्टर्स व ईस्ट बंगालविरुद्ध त्यांना गोलबरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले.

ISL : तब्बल आठ लढतीनंतर बंगळूरचा विजयासाठी वनवास संपुष्टात

खालिद जमील यांनी अंतरिम मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून नॉर्थईस्ट युनायटेडने अफलातून खेळ केला आहे. सलग तीन सामने जिंकताना त्यांनी अनुक्रमे जमशेदपूर, दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागान व अव्वल स्थानावरील मुंबई सिटी या संघांना नमविले.

रेड कार्डचा फटका

स्पर्धेत एफसी गोवासाठी रेड कार्ड मारक ठरले आहे. अखेरच्या दोन लढतीत दहा खेळाडूंसह त्यांना किल्ला लढवावा लागला. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध रेड कार्ड मिळालेला इव्हान गोन्झालेझ निलंबनानंतर गुरुवारी खेळण्यास उपलब्ध असेल, मात्र मध्यफळीतील हुकमी खेळाडू कर्णधार एदू बेदिया ईस्ट बंगालविरुद्धच्या रेड कार्डमुळे नॉर्थईस्टविरुद्ध खेळू शकणार नाही. ``खेळाडूस रेड कार्ड मिळाल्याने वाईट वाटते. बेदियासाठी प्रमुख खेळाडू अनुपलब्ध असला, तरी आपण वेगवेगळ्या नियोजनावर काम करत असून ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. नॉर्थईस्टविरुद्धच्या सामन्यासाठी व्यूहरचना वेगळी असेल आणि त्याची अंमलवजावणी होईल,`` असे प्रशिक्षक फेरांडो यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.

प्रोफेशनल लीग फुटबॉलमध्ये चर्चिल ब्रदर्सचा 5 - 0 फरकाने धुव्वा

प्ले-ऑफसाठी चुरस

एफसी गोवा, तसेच नॉर्थईस्ट हे दोन्ही संघ प्ले-ऑफ फेरीसाठी मुख्य दावेदार आहेत. प्रत्येकी 14 सामने खेळल्यानंतर त्यांचे समान 21 गुण आहेत. गोलसरासरीत एफसी गोवा (+5) चौथ्या, तर नॉर्थईस्ट (+1) पाचव्या क्रमांकावर आहे. गुरुवारी विजय मिळविणारा संघ हैदराबादला (22 गुण) मागे टाकून तिसरा क्रमांक मिळवेल.

दृष्टिक्षेपात...

- आयएसएलमधील 13 लढतीत एफसी गोवाचे 5, नॉर्थईस्टचे 2 विजय, 6 लढती बरोबरीत

- यंदा पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे 1-1 गोलबरोबरी

- एफसी गोवा व नॉर्थईस्टचे स्पर्धेत प्रत्येकी 19 गोल

- मागील 7 अपराजित लढतीत एफसी गोवाचे 3 विजय, 4 बरोबरी

- 4 अपराजित लढतीत नॉर्थईस्टचे 3 विजय, 1 बरोबरी

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे सर्वाधिक 10 गोल, आल्बर्टो नोगेराच्या 5 असिस्ट

संबंधित बातम्या