ISL 2021: एफसी गोवाचा जिगरबाज खेळ; मुंबई सिटीशी बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील लढत रंगतदार ठरली, पण 2-2 गोलबरोबरीमुळे सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील लढत निर्णायक ठरेल.

 

पणजी: एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील लढत रंगतदार ठरली, पण 2-2 गोलबरोबरीमुळे सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील लढत निर्णायक ठरेल. सोमवारी (ता. 8) अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक असेल.

उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामना शुक्रवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. एफसी गोवासाठी स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याने 20व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर, तर सेवियर गामा याने 59व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. मुंबई सिटीतर्फे खिंड लढविताना फ्रेंच मध्यरक्षक ह्युगो बुमूस याने 38व्या, तर भेदक हेडिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेनेगलचा मुर्तदा फॉल याने 62व्या मिनिटास लक्ष्य साधले.

ISL 2020-21 : एटीके मोहन बागानसमोर नॉर्थईस्टचा धोका

बरोबरीमुळे हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने आता आयएसएल स्पर्धेत सलग 14 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे. यंदा साखळी फेरीत अव्वल राहत लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीस एफसी गोवाने आज तुल्यबळ लढत दिली. मुंबईच्या संघास दोन वेळा पिछाडीवर जावे लागले. प्रमुख मध्यरक्षक आल्बर्टो नोग्युएरा व बचावपटू इव्हान गोन्झालेझ यांच्या अनुपस्थितीत खेळताना गोव्याच्या संघाने जिगरबाज खेळ केला. एफसी गोवाच्मया मध्यफळीत लक्षवेधक ठरलेला होर्गे ओर्तिझ सामन्याचा मानकरी ठरला.

पूर्वार्धात गोलबरोबरी

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल नोंदविल्यामुळे बरोबरी राहिली. 37 वर्षीय स्पॅनिश स्ट्रायकर इगोर आंगुलोच्या पेनल्टी गोलमुळे एफसी गोवाने आघाडी प्राप्त केली. आंगुलोने डाव्या पायाने पेनल्टी फटका अचूक मारताना मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याचा अंदाज चुकविला. अमरिंदर आपल्या डाव्या बाजूने झेपावला, तर आंगुलोचा फटका विरुद्ध दिशेने नेटमध्ये घुसला. मुंबई सिटीच्या मंदार राव देसाई याने पेनल्टी क्षेत्रात होर्गे ओर्तिझ याला पाडल्यानंतर एफसी गोवास पेनल्टी फटक्याचा लाभ मिळाला होता. 

विश्रांतीला सात मिनिटे असताना मुंबई सिटीने बरोबरी साधली. चार सामन्यांचे निलंबन संपवून संघात परतलेल्या ह्यूगो बुमूस याने एफसी गोवाच्या कमजोर बचावाचा डाव उठवत आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाविरुद्ध गोल केला. ह्युगो बुमूसच्या कल्पक असिस्टवर फ्रेंच खेळाडूच्या प्रेक्षणीय फटक्यासमोर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग पूर्णपणे चकला.

INDvsENG 4th Test : पहिल्या डावात रिषभ पंत ठरला पुन्हा तारणहार  

विश्रांतीस एक मिनिट असताना पेनल्टी क्षेत्रात मुंबई सिटीच्या अहमद जाहू आणि मंदार राव देसाई अडथळा आणल्यानंतर एफसी गोवाचा होर्गे ओर्तिझ पडला, पण रेफरीने पेनल्टी फटक्याचा दावा मान्य केला नाही.  त्यानंतर लगेच मुंबई सिटीस आघाडी घेण्याची संधी होती, परंतु बार्थोलोमेव ओगबेचे याचा हेडर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग याने वेळीच रोखला.

तीन मिनिटांत दोन गोल

सामन्याच्या उत्तरार्धातही चुरस कायम राहिली. विश्रांतीनंतर बाराव्या मिनिटास सेवियर गामा याने एफसी गोवास पुन्हा आघाडी मिळवून दिली, आदिल खानच्या असिस्टवर त्याने डाव्याच्या सणसणीत फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाचा बचाव भेदला. त्यानंतर लगेच सेनेगलच्या मुर्तदा फॉलने आयएसएल इतिहासातील तेरावा हेडिंग गोल साधल्याने मुंबई सिटीस पुन्हा बरोबरी साधता आली. अहमद जाहू याने तोलूनमापूस दिलेल्या हवेतील पासवर फॉलने एफसी गोवाच्या बचावफळीस पूर्णतः गुंगारा देत सुरेख हेडिंग साधले. दोन्ही गोल तीन मिनिटांत झाल्याने फिरून 2-2 गोलबरोबरी झाली. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना प्रिन्सटन रिबेलोच्या असिस्टवर आंगुलोने चेंडूस नेटची दिशा दाखविली होती, पण रेफरीने हँडबॉलची खूण करत गोल अवैध ठरविला, त्यामुळे एफसी गोवाच्या खाती आघाडी जमा झाली नाही.

दृष्टिक्षेपात....

  • - एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे मोसमातील 20 सामन्यांत 14 गोल, मुंबई सिटीविरुद्ध 2 गोल, एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णास गाठले
  • - मुंबई सिटीच्या ह्युगो बुमूसचे मोसमातील 14 लढतीत 3 गोल, एकंदरीत 56 आयएसएल सामन्यांत 19 गोल, एफसी गोवाविरुद्ध 2 गोल
  • - एफसी गोवाच्या 23 वर्षीय सेवियर गामा याचा मोसमातील 20 सामन्यांत 1 गोल, 33 आयएसएल सामन्यांत 2 गोल
  • - मुंबई सिटीच्या 33 वर्षीय मुर्तदा फॉल याचे यंदा 20 सामन्यांत 4 गोल, एकूण 60 आयएसएल लढतीत 13 गोल, सर्व हेडिंगद्वारे
  • - एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यातील 17 आयएसएल लढतीत 5 बरोबरी
  • - एफसी गोवा सलग 14 सामने अपराजित, 5 विजय, 9 बरोबरी
  • - मुंबई सिटीचे यंदा स्पर्धेत सर्वाधिक 37 गोल, तर एफसी गोवाचे 33 गोल

 
 

संबंधित बातम्या