आयएसएल: हैदराबाद संघात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू

क्रीडा प्रतिनिधी
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी हैदराबाद एफसी संघाने ऑस्ट्रेलियाचा आघाडीपटू जोएल चियानेज याला करारबद्ध केले आहे. तो तीस वर्षांचा आहे. 

पणजी:  आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी हैदराबाद एफसी संघाने ऑस्ट्रेलियाचा आघाडीपटू जोएल चियानेज याला करारबद्ध केले आहे. तो तीस वर्षांचा आहे. 

हैदराबादशी करार करण्यापूर्वी जोएलने २०१९-२० मोसमात ए-लीग फुटबॉल स्पर्धेतील पर्थ ग्लोरी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्या स्पर्धेत पर्थचे आव्हान प्ले-ऑफ फेरीत आटोपले होते. 

जोएलने ब्लॅकटाऊन सिटी एफसी संघाद्वारे व्यावसायिक कारकिर्दीस सुरवात केली. त्यानंतर २०११ साली तो ए-लीगमधील सिडनी एफसी संघात दाखल झाला. या संघातून तीन वर्षे खेळल्यानंतर नॅशनल प्रीमियर लीगमध्ये सिडनी युनायटेड व बॉनीरिग व्हाईट ईगल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले. जोएल नंतर मलेशियातील साबा एफए (२०१५) व नेगेरी सेम्बिलान एफए (२०१६) या संघातून खेळला. मलेशियातील सुपर लीगमध्ये त्याने १७ गोल नोंदविले. २०१६ साली तो पुन्हा ऑस्ट्रेलियात परतला आणि नंतर चार मोसम त्याने पर्थ ग्लोरी संघात नियमित स्थान राखले. ए-लीग स्पर्धेतील सात मोसमात त्याने २५ गोल केले आहेत. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत तो सिडनी एफसी आणि पर्थ ग्लोरी या संघातर्फे खेळला आहे.

डिन्लियाना याच्याशी जमशेदपूरचा करार
जमशेदपूर एफसी संघाने मिझोरामचा राईट-बॅक बचावपटू डिन्लियाना याच्याशी करार केला आहे. लाल्डिन्लियाना रेन्थलेई हे पूर्ण नाव असलेला हा खेळाडू २२ वर्षांचा आहे. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत तो चेन्नईयीन एफसी संघातर्फे खेळला होता. २०१७ साली मिझोराम प्रीमियर लीगमध्ये चिन्गा वेंग एफसीकडून खेळल्यानंतर या बचावपटूने २०१७-१८ मोसमातील आय-लीग स्पर्धेत ऐजॉल एफसीचे प्रतिनिधित्व केले. मिझोराममधील स्पर्धेत त्याला सर्वोत्कृष्ट बचावपटूचा किताब मिळाला. २०१८ साली त्याने चेन्नईयीन एफसीशी करार केला. आयएसएलमधील दोन मोसमात तो या संघाकडून ३४ सामने खेळला. ऐजॉल एफसीतर्फे एएफसी कप स्पर्धेत, तर चेन्नईयीन एफसीतर्फे एएफसी चँपियन्स लीग पात्रता फेरीतही तो खेळला आहे.

संबंधित बातम्या