ISL चेन्नईयीन एफसी संघ कमनशिबी ठरला

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्या अफलातून कामगिरीमुळे बंगळूर एफसीला सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात पराभवापासून सुटका करता आली.

पणजी: गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्या अफलातून कामगिरीमुळे बंगळूर एफसीला सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात पराभवापासून सुटका करता आली. चेन्नईयीन एफसी संघ कमनशिबी ठरला. संधी हुकल्यामुळे त्यांना गोलशून्य बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले.

सामना शुक्रवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामनावीर गुरप्रीतने सलग दुसऱ्या लढतीत क्लीन शीट राखताना चेन्नईयीन एफसी आघाडी घेणार नाही याची दक्षता संपूर्ण नव्वद मिनिटांच्या खेळात घेतली. बंगळूरची ही 16 लढतीतील सातवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 19 गुण झाले असून सहावा क्रमांक कायम आहे. चेन्नईयीनची ही आठवी बरोबरी ठरली. त्यांचे 16 लढतीनंतर 17 गुण झाले असून आठवा क्रमांक बदलला नाही.

सामन्याचा पूर्वार्ध विशेष रंगतदार ठरू शकला नाही. दोन्ही संघांनी एकमेकांचे सामर्थ्य तपासण्यावर भर दिल्यामुळे चेंडू मध्यक्षेत्रातच जास्तवेळ दिसला. चेन्नईयीनने खोलवर आक्रमण केले, परंतु बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. विश्रांतीस पाच मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनच्या इस्माईल गोन्साल्विस याचा धोकादायक प्रयत्न गुरप्रीतने बचावफळीच्या सहकार्याने उधळून लावला.

चेन्नईयीनने उत्तरार्धात बंगळूरवर हल्ले चढविले, पण त्यांना गोल करण्यात यश मिळाले नाही. विश्रांतीनंतरच्या दुसऱ्याच मिनिटास मान्युएल लान्झारोतेच्या फ्रीकिकवर गोलरक्षक संधूने चेंडू गोलपट्टीवरून बाहेर जाईल याची दक्षता घेतली. तासाभराच्या खेळानंतर गोलरक्षक संधूने पुन्हा इस्माईलचा फटका यशस्वी ठरू दिला नाही. सामन्यातील बारा मिनिटे बाकी असताना संधू पुन्हा एकदा बंगळूरच्या मदतीस धावून आला आणि लाल्लियानझुआला छांगटे याला यश मिळू दिले नाही. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना मेमो मौरा याच्या सणसणीत फटक्यावर बंगळूरच्या गोलरक्षकाचा अंदाज चुकला होता, पण चेंडू गोलपोस्टला आपटल्यामुळे चेन्नईयीनची आणखी एक संधी हुकली.

 

दृष्टिक्षेपात...

  • - चेन्नईयीन एफसीच्या यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक 6 गोलशून्य बरोबरी
  • - स्पर्धेत चेन्नईयीनच्या सर्वाधिक 8 बरोबरी
  • - बंगळूर एफसीच्या स्पर्धेत 4 क्लीन शीट्स
  • - बंगळूरच्या यंदा 2 गोलशून्य बरोबरी
  • - स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बंगळूरचा चेन्नईयीनवर 1-0 फरकाने विजय
     

संबंधित बातम्या