आयएसएल स्पर्धा केंद्राचा निर्णय लवकरच

क्रीडा प्रतिनिधी
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) पाहणी पथकाच्या अहवालानंतर लवकरच आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा केंद्राचा निर्णय जाहीर होणे अपेक्षित आहे. स्पर्धेच्या यजमानपदास गोव्यास प्राधान्य मिळू शकते. 

पणजी:  फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) पाहणी पथकाच्या अहवालानंतर लवकरच आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा केंद्राचा निर्णय जाहीर होणे अपेक्षित आहे. स्पर्धेच्या यजमानपदास गोव्यास प्राधान्य मिळू शकते. 

कोरोना विषाणू महामारीच्या देशातील परिस्थिती प्रवासासाठी योग्य नाही हे बाब ध्यानात घेऊन २०२०-२१ मोसमातील आयएसएल स्पर्धा एकाच राज्यात घेण्याचा निर्णय एफएसडीएलने काही दिवसांपूर्वी घेतला होता. या स्पर्धेसाठी गोवा आणि केरळ या राज्यांना प्राधान्यक्रम मिळाला होता. आगामी स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात होईल. नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रिकाम्या स्टेडियमवर सामने खेळविण्याचे आयोजकांचे नियोजन आहे. कोविड-१९ मुळे यावर्षी मार्चमध्ये आयएसएल स्पर्धेचा अंतिम सामना रिकाम्या स्टेडियमवर गोव्यात झाला होता.

प्राप्त माहितीनुसार, केरळमध्ये सहभागी संघांच्या प्रवासात वाढ होऊ शकते आणि त्यामुळे गुंतागुंत वाढू शकते, त्यामुळे छोटे राज्य असलेल्या गोव्यातच आयएसएल स्पर्धा सातवा मोसम रंगू शकतो. गोव्यात दर्जेदार हॉटेल असल्याने सहभागी दहाही संघांच्या निवासाचा प्रश्नही निकालात निघू शकेल. शिवाय मैदानेही जवळपास असल्याने संघांना जास्त प्रवास करावा लागणार नाही.  

वृत्तसंस्थेनुसार, एफएसडीएलचे पथक गोव्यात दाखल झाले असून त्यांच्याद्वारे राज्यातील मैदानांची पाहणी होईल, यामध्ये मुख्य स्टेडियम, तसेच सराव मैदानांचाही समावेश असेल. आयोजन समितीचे पदाधिकारी राज्यातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशीही संपर्क साधतील. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पाहणी पथक फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, वास्को येथील टिळक मैदान, बांबोळी स्टेडियम, याशिवाय सुमारे दहा सराव मैदानांची पाहणी करतील.
 

संबंधित बातम्या