आयएसएल गोव्यात, आय-लीग कोलकात्यात?

किशोर पेटकर
मंगळवार, 14 जुलै 2020

आय-लीग स्पर्धेत खेळणाऱ्या क्लबचे परदेशी खेळाडू उपलब्ध झाले नाहीत, तरीही २०२०-२१ आय-लीग मोसम परदेशी खेळाडूंविना खेळला जाईल, अशी माहिती दास यांनी दिली.

नवी दिल्ली

देशातील कोरोना विषाणू परिस्थिती निवळली नाही, तर २०२०-२१ मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा गोव्यात, तर आय-लीग फुटबॉल स्पर्धा कोलकात्यात घेण्याचे संकेत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी दिले आहेत. वेबिनारद्वारे संबोधित करताना त्यांनी मत व्यक्त केले.

गोव्यात एकापेक्षा जास्त मैदानांची उपलब्धता असल्यामुळे आयएसएल स्पर्धा गुंतवणूकदार फुटबॉलवेड्या राज्याला पसंती देत असल्याचे दास यांनी नमूद केले. कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमचे १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेनिमित्त नूतनीकरण सुरू आहे, त्यामुळे या मैदानावर आयएसएल होऊ शकणार नाही, तर कोलकात्यात आय-लीग स्पर्धा होऊ शकते, असे दास यांना वाटते.

आय-लीग स्पर्धेत खेळणाऱ्या क्लबचे परदेशी खेळाडू उपलब्ध झाले नाहीत, तरीही २०२०-२१ आय-लीग मोसम परदेशी खेळाडूंविना खेळला जाईल, अशी माहिती दास यांनी दिली. कोरोना विषाणू महामारीमुळे प्रवासावर निर्बंध असल्याने गेल्या मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा निलंबित आहे.

बिबियान, व्यंकटेश यांचे कौतुक

भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद पुढील पाच वर्षांत भारतीयाने भूषवावे यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सचिवांनी सांगितले. दास यांनी भारताच्या १६ वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियान फर्नांडिस आणि सीनियर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांचे सहाय्यक षण्मुगम व्यंकटेश यांचे कौतुक केले.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या