इंडियन सुपर लीग: हैदराबादची गोव्यातील खेळाडूंना पसंती

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

नव्या मोसमाच्या सुरवातीसच एफसी गोवा डेव्हलपमेंट संघातील २० वर्षीय मध्यरक्षक स्वीडन फर्नांडिस याला हैदराबादने आपल्या संघात सामावले आहे. हैदराबाद एफसीने आदिलला २०२३ पर्यंत, साहिल व लिस्टनला २०२२ पर्यंत, तर लक्ष्मीकांत कट्टीमनीस २०२१ पर्यंत करारबद्ध केले आहे. 

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दुसरा मोसम खेळण्यास तयार असलेल्या हैदराबाद एफसीने गोव्यातील फुटबॉलपटूंना पसंती दिली आहे. या संघाने २०२०-२१ मोसमासाठी गोमंतकीय खेळाडूंना करारबद्ध केलेय.

हैदराबाद एफसीने २०१९-२० मोसमात आयएसएल स्पर्धेत पदार्पण केले, तेव्हा आदिल खान, साहिल ताव्होरा आणि लक्ष्मीकांत कट्टीमनी हे गोव्याचे तिघे जण संघात होते. त्यानंतर या वर्षी जानेवारीत त्यांनी एफसी गोवाचा आघाडीपटू २१ वर्षीय लिस्टन कुलासो याला आपल्या संघात घेतले. आता नव्या मोसमाच्या सुरवातीसच एफसी गोवा डेव्हलपमेंट संघातील २० वर्षीय मध्यरक्षक स्वीडन फर्नांडिस याला हैदराबादने आपल्या संघात सामावले आहे. हैदराबाद एफसीने आदिलला २०२३ पर्यंत, साहिल व लिस्टनला २०२२ पर्यंत, तर लक्ष्मीकांत कट्टीमनीस २०२१ पर्यंत करारबद्ध केले आहे. 

बंगळूर एफसीसाठी २०१६ ते २०१६ या कालावधीत मार्गदर्शन केलेले स्पॅनिश आल्बर्ट रोका हैदराबादचे नव्या मोसमातील प्रशिक्षक आहेत. आयएसएलमधील पहिल्याच मोसमात हैदराबादला तळाचे दहावे स्थान मिळाले होते, यंदा कामगिरी उंचावण्याची त्यांनी अपेक्षा आहे. सुरवातीचे पाच मोसम खेळलेल्या पुणे सिटी एफसीचे व्यवस्थापन गतवर्षी हैदराबादमध्ये हस्तांतरीत झाले होते.

बचावफळीतील हुकमी एक्का ३२ वर्षीय आदिल खान गतमोसमात १४ सामने खेळला. नव्या मोसमातही आदिल याच्यावर हैदराबादच्या बचावाची धुरा असेल. एफसी गोवाचा माजी कर्णधार ३१ वर्षीय गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीने सहा, तर २४ वर्षीय मध्यरक्षक साहिलने दोन सामन्यांत प्रतिनिधित्व केले. एफसी गोवा संघात संधी मिळत नसल्याचे पाहून हैदराबादला आलेल्या लिस्टनने लक्षवेधक कामगिरी करताना दोन गोल केले, तसेच तो २२७ मिनिटे मैदानावर खेळला. आगामी मोसमातही लिस्टन हैदराबादच्या आघाडीफळीत महत्त्वाचा खेळाडू असेल. 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या