आयएसएलच्या सातव्या मोसमात नव्या संघास संधी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

आयएसएल स्पर्धेत सध्या दहा संघांचा समावेश आहे. नव्या संघाच्या समावेशानंतर आगामी आयएसएलमध्ये अकरा संघांत चुरस राहील.

पणजी: गोव्यात येत्या नोव्हेंबरमध्ये बंद दरवाज्याआड खेळल्या जाणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात नव्या संघास संधी मिळेल. स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांनी स्पर्धेतील अकराव्या संघासाठी देशातील सहा शहरांतून निविदा प्रस्ताव मागविले आहेत.

आयएसएल स्पर्धेत सध्या दहा संघांचा समावेश आहे. नव्या संघाच्या समावेशानंतर आगामी आयएसएलमध्ये अकरा संघांत चुरस राहील. एफएसडीएलने दिल्ली, लुधियाना, अहमदाबाद, कोलकाता, सिलिगुडी, भोपाळ या शहरातील इच्छुक फ्रँचायजीकडून प्रस्ताव मागितले आहेत. ऑनलाईन प्रस्ताव १४ सप्टेंबरपर्यंत, तर व्यक्तिशः किंवा कुरियरद्वारे प्रस्ताव १७ सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जातील. छाननी प्रक्रियेनंतर एका फ्रँचायजी संघाला संधी मिळेल.

ईस्ट बंगाल शर्यतीत
कोलकात्यातील ईस्ट बंगाल संघ सातव्या आयएसएल स्पर्धेत खेळण्यास इच्छुक आहे. त्या दृष्टीने श्री सिमेंट कंपनीने ईस्ट बंगालचा सर्वाधिक हिस्सा मिळविला असून ते या संघाचे मुख्य पुरस्कर्ते आहेत. नव्या पुरस्कर्त्यांच्या पाठबळावर ईस्ट बंगाल संघ आयएसएल स्पर्धेसाठी निविदा प्रस्ताव सादर करण्याचे वृत्त आहे. सध्या आयएसएल स्पर्धेत कोलकात्यातील एक संघ आहे. गत आयएसएल विजेत्या एटीके संघात आय-लीग विजेत्या मोहन बागानचे विलनीकरण झाले असून नव्या मोसमात एटीके-मोहन बागान संघ मैदानात उतरेल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या