आयएसएल: चेन्नईयीनची गाडी पुन्हा रुळावर; इस्माईलच्या गोलमुळे ओडिशाला नमविले

आयएसएल: चेन्नईयीनची गाडी पुन्हा रुळावर; इस्माईलच्या गोलमुळे ओडिशाला नमविले
Gomantak Banner (4).jpg

पणजी : सामन्याच्या पूर्वार्धात इस्माईल गोन्साल्विस याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर चेन्नईयीन एफसीने गुरुवारी चार सामन्यानंतर विजयाची चव चाखली. सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत त्यांनी ओडिशा एफसीला 2 - 1 फरकाने हरवून गाडी पुन्हा रुळावर आणली.

सामना बुधवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. चेन्नईयीनसाठी पूर्वार्धात गिनी बिसाँचा आंतरराष्ट्रीय आघाडीपटू इस्माईल गोन्साल्विस याने 15व्या मिनिटास पहिला गोल केला, नंतर 21व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर संघाची आघाडी वाढविली. बदली खेळाडू ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याने 64 व्या मिनिटास ओडिशाची पिछाडी एका गोलने कमी केली.

चेन्नईयीनने मागील चार सामन्यात तीन बरोबरी व एक पराभव अशी कामगिरी केल्यानंतर अखेर विजय प्राप्त केला. एकंदरीत त्यांचा हा 11 लढतीतील तिसरा विजय ठरला असून 14 गुण झाले आहेत. त्यांनी आता पाचव्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली आहे. पहिल्या टप्प्यात चेन्नईयीनला गोलशून्य बरोबरीत रोखलेल्या ओडिशाला सातवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 11 लढतीनंतर त्यांचे सहा गुण आणि तळाचा अकरावा क्रमांक कायम राहिला.

पूर्वार्धातील दोन्ही गोल इस्माईल गोन्साल्विस (इस्मा) याने सहा मिनिटांच्या फरकाने नोंदविले. त्यापूर्वी आठव्या मिनिटास गोल करण्याची सोपी संधी दवडल्यानंतर त्याने अखेर संधी साधली. या वेगवान स्ट्रायकरला रोखणे ओडिशाच्या गौरव बोरा याला जमले नाही. त्याचा लाभ उठवत इस्मा याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक अर्शदीप सिंग याला सहजपणे चकविले. पाच मिनिटानंतर चेन्नईयीनला पेनल्टी फटका मिळाला. बोरा याची चुकी ओडिशाला भोवली. त्याने गोलक्षेत्रात चेन्नईयीनच्या अनिरुद्ध थापा याला पाडले. त्यावेळी रेफरींनी पेनल्टी फटक्याची खूण केल्यानंतर इस्मा याने शांतपणे लक्ष्य साधताना गोलरक्षक अर्शदीपचा अंदाज चुकविला.

उत्तरार्धाच्या प्रारंभीच हुकमी खेळाडू दिएगो मॉरिसियो याला संधी देताना ओडिशाचे प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्स्टर यांनी ब्राझीलियन मार्सेलिन्हो याला विश्रांती दिली. तासाभराच्या खेळानंतर लगेच मॉरिसियोने प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरविताना ओडिशाची पिछाडी एका गोलने कमी केली. कोल अलेक्झांडर याने हेडिंगद्वारे मॉरिसियोच्या दिशेने चेंडू टाकला. या 29 वर्षीय आघाडीपटूने प्रतिस्पर्धी बचावपटूबरोबरची शर्यत जिंकताना शानदार सणसणीत फटक्यावर गोलरक्षक विशाल कैथ यालाही चकविले.

सामन्याच्या पूर्वार्धातील 37व्या मिनिटास ओडिशाच्या मान्युएल ओन्वू याचा नेम चुकल्यामुळे चेन्नईयीनची दोन गोलची आघाडी अबाधित राहिली होती. सामन्याची दहा मिनिटे बाकी असताना कर्णधार एली साबिया याचा हेडर दिशाहीन ठरल्यामुळे चेन्नईयीनच्या आघाडीत वाढ झाली नाही.

दृष्टिक्षेपात...

- एस्माईल गोन्साल्विस याचे आयएसएलमधील 7 सामन्यात 3 गोल

- दिएगो मॉरिसियो याचे 11 आयएसएल सामन्यात 6 गोल

- स्पर्धेत चेन्नईयीनचे 10, तर ओडिशाचे 11 गोल

- ओडिशाचे यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक 7 पराभव


 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com