ISL: जमशेदपूरला अखेर पूर्ण तीन गुण पाच लढतीनंतर विजयाची नोंद; ओडिशावर एका गोलने मात

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

सामन्याच्या 41व्या मिनिटास मध्यरक्षक महंमद मोबाशीर रेहमानच्या थेट क्रॉसपासवर झालेला गोल जमशेदपूरसाठी निर्णायक ठरला.

पणजी : सामन्यातील पूर्वार्धातील खेळात नोंदविलेल्या गोलच्या बळावर सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत जमशेदपूरने पाच लढतीनंतर विजयाची चव चाखली. त्यांनी ओडिशा एफसाला 1-0 फरकाने निसटते हरविले.

सामना सोमवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. सामन्याच्या 41व्या मिनिटास मध्यरक्षक महंमद मोबाशीर रेहमानच्या थेट क्रॉसपासवर झालेला गोल जमशेदपूरसाठी निर्णायक ठरला. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये फारुख चौधरीस जमशेदपूरची आघाडी वाढविण्याचा सुरेख संधी होती, पण गोलरक्षक अर्शदीप याला फटक्याने चकवा दिल्यानंतर चेंडूने गोलपोस्टचा वेध घेतला. ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंगमुळे जमशेदपूरला मोठा विजय नोंदविणे शक्य झाले नाही.

ISL :एफसी गोवाचा लेनीस निरोप

जमशेदपूरचा हा तीन पराभव व दोन बरोबरीनंतरचा पहिला विजय ठरला. एकंदरीत ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 15 लढतीत चौथा सामना जिंकला. त्यांचे आता 18 गुण झाले आहेत. ते आता सहाव्या स्थानी आले आहेत. स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा एफसीची खराब कामगिरी कायम राहिली. 14 लढतीत त्यांना आठ पराभव पत्करावे लागले आहेत. आठ गुणांसह हा संघ तळाच्या अकराव्या स्थानी कायम आहे.

विश्रांतीला चार मिनिटे बाकी असताना ओडिशाच्या बचावफळीतील चुकीमुळे जमशेदपूरला आघाडी मिळाली. जमशेदपूरच्या महंमद मोबाशीर रेहमान याने दूरवरून मारलेल्या क्रॉसपासवर ओडिशाचा बचावपटू पेनल्टी क्षेत्रात नेरियूस व्हाल्सकिस याला रोखू शकला नाही, त्यामुळे गोलरक्षक अर्शदीप सिंगचा गोंधळ उडाला आणि चेंडू थेट नेटमध्ये घुसला. झारखंडमधील जमशेदपूर येथील या मध्यरक्षकाचा हा पहिलाच आयएसएल गोल ठरला. पूर्वार्धातील लढतीत जमशेदपूरने वर्चस्व राखताना वारंवार ओडिशाच्या बचावफळीची परीक्षा पाहिली.

गोवा प्रोफेशनल फुटबॉल लीग : धेंपो स्पोर्टस क्लबची सेझा अकादमीवर सहज मात

उत्तरार्धातील खेळात 72व्या मिनिटास अर्शदीप सिंग याने सुरेख गोलरक्षण करताना फारुख चौधरीचा फटका वेळीच रोखल्यामुळे जमशेदपूरची आघाडी एका गोलपुरती मर्यादीत राहिली. त्यापूर्वी 51व्या मिनिटास अर्शदीपने दक्षता दाखवत अलेक्झांडर लिमा याचा प्रयत्न उधळून लावला होता. विश्रांतीनंतरच्या दुसऱ्याच मिनिटास अर्शदीपने सेईमेन्लेन डौंगेल याचा फटका झेपावत अडविला होता. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना ओडिशा एफसीच्या दिएगो मॉरिसियोने गोलरक्षक टीपी रेहेनेश याने पेनल्टी क्षेत्रात पाडल्याचा दावा केला, पण रेफरीने त्यास दाद दिली नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- 22 वर्षीय महंमद मोबाशीर रेहमान याचा 35 आयएसएल सामन्यात 1 गोल

- पहिल्या टप्प्यातील 2-2 गोलबरोबरीनंतर जमशेदपूरची ओडिशावर मात

- जमशेदपूरचे यंदाच्या स्पर्धेत 14 गोल

- ओडिशावर प्रतिस्पर्ध्यांचे 21 गोल

- यंदा स्पर्धेत ओडिशाचे सर्वाधिक 8 पराभव

संबंधित बातम्या