मेघालयाचा मध्यरक्षक फ्रांग्की बुआम एफसी गोवा संघात; तीन वर्षांचा करार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

शिलाँग लाजाँग एफसी संघातर्फे २०१८-१९ मोसमातील आय-लीग स्पर्धा गाजविलेला फ्रांग्की बुआम देशातील युवा गुणवान मध्यरक्षक मानता जातो. दोन मोसमांपूर्वीच्या आय-लीग स्पर्धेत स्पर्धेत त्याने सहा गोल नोंदविले होते.

पणजी: मेघालयातील १९ वर्षीय मध्यरक्षक फ्रांग्की बुआम याच्याशी एफसी गोवा संघाने तीन वर्षांसाठी करार केला आहे. त्याला प्रथमच आयएसएल संघाकडून संधी प्राप्त झाली आहे.

शिलाँग लाजाँग एफसी संघातर्फे २०१८-१९ मोसमातील आय-लीग स्पर्धा गाजविलेला फ्रांग्की बुआम देशातील युवा गुणवान मध्यरक्षक मानता जातो. दोन मोसमांपूर्वीच्या आय-लीग स्पर्धेत स्पर्धेत त्याने सहा गोल नोंदविले होते. 

एफसी गोवा संघात रुजू होणे ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया करारपत्रावर सही केल्यानंतर फ्रांग्की याने दिली. या संघातून खेळताना भविष्यात चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य असल्याचे त्याने नमूद केले. एफसी गोवाचा खेळ पाहून मागील काही वर्षांत आपण या संघाचा चाहता बनलो आहे. या संघाची शैली, नेहमीच आक्रमणावर भर देण्याची त्यांची मानसिकता आपणास भावते. त्यामुळे या संघात दाखल होणे आपणासाठी स्वप्नपूर्ती आहे, असे फ्रांग्की याने सांगितले.  

लाजाँग अकादमीतून उदयास आलेला फ्रांग्की हा उज्ज्वल भविष्य असलेला अफाट गुणवत्तेचा फुटबॉलपटू आहे. त्याची नजर नेहमीच गोलवर असते आणि आमच्या क्लबच्या शैलीत तो योग्य ठरतो, असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी सांगितले.

फुटबॉलपटू फ्रांग्की बुआम याच्याविषयी

  • मेघालयातील जैन्तिया हिल्स येथील रहिवासी
  • रॉयल वाहिंगडोहच्या १६ व १८ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व
  • २०१८ साली शिलाँग लाजाँगच्या १८ वर्षांखालील संघातून यूथ लीगमध्ये चमक 
  • २०१८ मध्ये आय-लीग स्पर्धेत पदार्पण, शिलाँग लाजाँगतर्फे ६ गोल 
  • गतमोसमात शिलाँग लाजाँगकडून शिलाँग प्रीमियर लीग व मेघालय राज्य लीग विजेता
  • द्वितीय विभाग आय-लीग स्पर्धेत बंगळूर युनायटेडचे प्रतिनिधित्व

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या