इंडियन सुपर लीग: ‘अपराजित’ संघात जोरदार चुरस

इंडियन सुपर लीग: ‘अपराजित’ संघात जोरदार चुरस
ISL Mumbai City expects a tough challenge from East Bengal

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सध्या मुंबई सिटी दहा, तर ईस्ट बंगाल सात लढतीत अपराजित आहे. त्यांच्यातील लढतीत शुक्रवारी (ता. 22) जोरदार चुरस अपेक्षित असेल.

वास्को येथील टिळक मैदानावर होणाऱ्या लढतीत ईस्ट बंगालकडून मुंबई सिटीस कडवे आव्हान मिळू शकते. स्पर्धेतील पहिल्या लढतीत हार पत्करल्यानंतर मुंबई सिटीने 10 लढतीत आठ विजय व दोन बरोबरी नोंदवून गुणतक्त्यात आघाडी मिळविली आहे. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे 11 लढतीतून 26 गुण झाले असून शुक्रवारी आणखी एक विजय नोंदविल्यास त्यांचे अग्रस्थान खूपच भक्कम होईल. महत्त्वाची बाब म्हणजे, सात सामन्यांत एकही गोल स्वीकारले नाही. ओळीने चार सामने जिंकल्यानंतर मागील लढतीत मुंबई सिटीस हैदराबादने गोलशून्य बरोबरीत रोखले होते, त्यामुळे त्यांना दोन गुणांचे नुकसान सोसावे लागले.

रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालचे आयएसएलमधील पदार्पण निराशाजनक ठरले. मात्र मागील सात लढतीत त्यांनी खेळ कमालीचा उंचावला आहे, त्यामुळे मुंबई सिटीस सावध राहावे लागेल. ईस्ट बंगाल सात लढतीत दोन विजय व पाच बरोबरी नोंदवून सध्या अपराजित आहे. अगोदरच्या लढतीत पूर्वार्धात रेड कार्डमुळे एक खेळाडू कमी होऊनही त्यांनी चेन्नईयीन एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. ईस्ट बंगालचे आक्रमण धोकादायक आहे, त्यामुळे मुंबई सिटीच्या बचावफळीवर दबाव येऊ शकतो.

दृष्टिक्षेपात...

  • - मुंबई सिटीचे यंदा 17 गोल, एफसी गोवासह संयुक्त अव्वल
  • - ईस्ट बंगालचे स्पर्धेत 11 गोल
  • - स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे मुंबई सिटीची ईस्ट बंगालवर 3-0 फरकाने मात
  • - मुंबई सिटीच्या 7, ईस्ट बंगालच्या 3 क्लीन शीट्स
     
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com