आयएसएल: इंग्लिश बचावपटू स्टीवन टेलर ओडिशा संघात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

ओडिशा एफसी संघात दाखल होण्यापूर्वी तो ऑस्ट्रेलियातील ए-लीग स्पर्धेत वेलिंग्टन फिनिक्स संघाकडून खेळला होता. इंग्लंडमधील न्यूकॅसल युनायटेडच्या युवा फुटबॉल अकादमीत स्टीवन टेलर याच्या गुणवत्तेवर पैलू पाडले गेले.

पणजी: आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी ओडिशा एफसीने इंग्लिश बचावपटू स्टीवन टेलर याच्याशी एका वर्षाचा करार केला आहे. या ३४ वर्षीय खेळाडूपाशी युरोप, तसेच आशिया-ओसेनिया विभागातील व्यावसायिक फुटबॉलचा दीर्घानुभव आहे.

ओडिशा एफसी संघात दाखल होण्यापूर्वी तो ऑस्ट्रेलियातील ए-लीग स्पर्धेत वेलिंग्टन फिनिक्स संघाकडून खेळला होता. इंग्लंडमधील न्यूकॅसल युनायटेडच्या युवा फुटबॉल अकादमीत स्टीवन टेलर याच्या गुणवत्तेवर पैलू पाडले गेले. न्यूकॅसलच्या सीनियर संघात त्याने २००३-०४ मोसमात पदार्पण केले. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये सुमारे दशकभर खेळल्यानंतर तो २०१६ साली अमेरिकेतील पोर्टलंड टिंबर्स संघात दाखल झाला. एका मोसमानंतर तो इंग्लंडमध्ये परतला आणि इप्सविक टाऊन आणि पीटरबोरो युनायटेड संघाचे प्रनिधित्व केले. नंतर वेलिंग्टन फिनिक्स संघाचे दोन मोसम प्रतिनिधित्व करताना तो ४७ सामने खेळला.  

ओडिशा संघातील आणखी एक परदेशी खेळाडू ऑस्ट्रेलियन बचावपटू जेकब ट्रॅट आता टेलरचा बचावफळीतील सहकारी असेल. ए-लीगमध्ये जेकब पर्थ ग्लोरी संघातून खेळत असताना टेलरचा प्रतिस्पर्धी होता.

ओडिशा एफसीने अन्य खेळाडूंत गोव्याचा जॉर्ज डिसोझा याच्यासह कमलप्रीत सिंग, हेन्ड्री अंतोने, सौरभ मेहेर यांच्या २०२०-२१ मोसमासाठीच्या करारावरही शिक्कामोर्तब केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या