आयएसएलची 'केरळा ब्लास्टर्सचा' विरूद्ध 'चेन्नईयीन एफसी' साऊथ डर्बी गोलशून्य बरोबरीत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

याकुब सिल्वेस्टर याची किक केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने अप्रतिमपणे रोखली. त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील साऊथ डर्बी रविवारी गोलशून्य बरोबरीत राहिली.

पणजी : चेन्नईयीन एफसीला आघाडी घेण्याची सुरेख संधी होती, पण याकुब सिल्वेस्टर याची किक केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने अप्रतिमपणे रोखली. त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील साऊथ डर्बी रविवारी गोलशून्य बरोबरीत राहिली.

 

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत चेन्नईयीनला दोन गुणांचे नुकसान सहन करावे लागले. केरळा ब्लास्टर्सची ही सलग दुसरी बरोबरी ठरली. त्यांचे आता तीन लढतीनंतर दोन गुण झाले आहेत. चेन्नईयीनचे आता दोन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. सामना विशेष आक्रमक ठरू शकला नाही, चेंडू बहुतांश मध्यफळीतच दिसला. 76व्या मिनिटास गमावलेल्या पेनल्टी फटक्यामुळे चेन्नईच्या संघास सलग दुसरा विजय नोंदविणे शक्य झाले नाही.

 

सामन्यातील सोळा मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनच्या राफेल क्रिव्हेलारो याला गोलक्षेत्रात केरळा ब्लास्टर्सच्या सर्जिओ सिदोन्चा याने मागून टॅकल केले. रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी सिदोन्चाला यलो कार्ड दाखवत, चेन्नईयीनसाठी पेनल्टी फटक्याची खूण केली. स्लोव्हाकियाच्या याकुब सिल्वेस्टर याला संघासाठी आघाडी मिळवून देण्याची सुरेख संधी प्राप्त झाली होती, पण तो गोमंतकीय गोलरक्षक आल्बिनो याचा बचाव भेदू शकला नाही. याकुबूने गोलरक्षकाच्या डाव्या बाजूने फटका मारला, पण दुखापतीनंतर यंदा पुनरागमन करणाऱ्या आल्बिनोने चेंडूंचा अचूक अंदाज टिपला. योग्य दिशेने झेपावत त्याने संघावरील संकट टाळले.

 

इंज्युरी टाईममधील पाच मिनिटांच्या खेळात केरळा ब्लास्टर्सच्या सर्जिओ सिदोन्चा याला दुखपतीमुळे मैदान सोडावे लागले, त्यापूर्वीच या संघाने पाच बदली खेळाडूंचा कोटा संपविला होता. त्यामुळे अखेरची दोन मिनिटे त्यांना दहा खेळाडूंसह खेळावे लागले, पण नुकसान झाले नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- आयएसएलमध्ये चेन्नईयीन एफसी व केरळा ब्लास्टर्स यांच्यात 6 बरोबरी

- एकूण लढती 15, चेन्नईयीनचे 6, तर केरळा ब्लास्टर्सचे 3 विजय

- यंदाच्या स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सकडून प्रथमच क्लीन शीट

- सामन्यात केरळा ब्लास्टर्सचे 413, तर चेन्नईयीनचे 309 पास

 

अधिक वाचा :

आयएसएलमध्ये पूर्ण गुण मिळवण्यासाठी एफसी गोवाचा आज नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध लागणार कस 

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यादरम्यान  षटकांची गती न राखल्यामुळे भारतीय संघाला दंड 

संबंधित बातम्या