आयएसएल फुटबॉल स्पर्धा तयारीची लगबग; तीन मुख्य मैदानांवर सामने

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

स्पर्धेतील संघाच्या सरावासाठी स्पर्धा आयोजकांनी राज्यात १२ मैदाने आरक्षित केली आहेत. स्पर्धेतील सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळीचे जीएमसी एथलेटिक्स स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदानावर खेळले जातील.

पणजी: गोव्यात बंद दरवाज्याआड होणाऱ्या सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात राज्यातील तीन स्टेडियमवर प्रेक्षकांविना स्पर्धा खेळली जाईल. 

स्पर्धा पूर्वतयारीनिमित्त सहभागी संघ सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यात दाखल होणे अपेक्षित आहे. सध्या सराव मैदानांचे, तसेच तिन्ही मुख्य स्टेडियमना नवी झळाली देण्याचे काम सुरू झाले आहे. 

सर्व संघांच्या सरावास ऑक्टोबरमध्ये सुरवात होईल. प्राप्त माहितीनुसार, बंगळूर एफसी वगळता अन्य संघांनी मोसमपूर्व सरावासाठी गोव्यालाच प्राधान्य दिले आहे. स्पर्धेतील संघाच्या सरावासाठी स्पर्धा आयोजकांनी राज्यात १२ मैदाने आरक्षित केली आहेत. स्पर्धेतील सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळीचे जीएमसी एथलेटिक्स स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदानावर खेळले जातील.

एफसी गोवा संघाने गतमोसमात साल्वादोर-द-मुंद पंचायतीसमवेत सामंजस्य करार होता, त्यामुळे त्यांचा सराव या मैदानावर सुरू होईल. त्यापूर्वी काही काळ हा संघ एला-जुने गोवे येथील धेंपो अकादमी मैदानावर सराव करण्याचे संकेत आहेत. साल्वादोर-द-मुंद पंचायत मैदानावर ऑक्टोबरअखेरपासून ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखालील संघ सराव सुरू करण्याचे नियोजन आहे.

कर्नाटकातील बळ्ळारी येथे बंगळूर एफसी संघाचे अद्ययावत सराव मैदान सुविधा आहेत. त्यामुळे तेथे सराव करून हा संघ नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी गोव्यात दाखल होऊ शकतो. आयएसएल स्पर्धेच्या कालावधीत धेंपो अकादमी मैदान त्यांच्यासाठी सराव केंद्र असेल. हैदराबाद एफसीने माँत-द-गिरी येथील सेंट अँथनी हायस्कूलच्या मैदानास सरावासाठी प्राधान्य दिल्याची माहिती आहे.

आयोजकांच्या सध्याच्या नियोजनानुसार, एटीके मोहन बागान एफसी बाणावली येथील ट्रिनिटी मैदानावर, चेन्नईयीन एफसी उतोर्डा येथील गोवा क्रीडा प्राधिकरण मैदानावर, मुंबई सिटी एफसी नागोवा पंचायत मैदानावर, ओडिशा एफसी बेताळभाटी मैदानावर, केरळा ब्लास्टर्स पेडे-म्हापसा क्रीडा संकुल मैदानावर, जमशेदपूर एफसी सांगोल्डा येथील मैदानावर, तर नॉर्थईस्ट युनायटेड कांदोळी येथील मैदानावर सराव करणे अपेक्षित आहे. आयएसएलमधील अकरावा संघ निश्चित झाल्यानंतर, या संघाचाही सराव गोव्यातच होईल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या