ISL : इंज्युरी टाईम गोलमुळे ईस्ट बंगालची बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

सामन्याच्या इंज्युरी टाईममधील शेवटच्या मिनिटास स्कॉट नेव्हिल याने नोंदविलेल्या गोलमुळे ईस्ट बंगालने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सला 1-1 गोलबरोबरीत रोखले.

पणजी : सामन्याच्या इंज्युरी टाईममधील शेवटच्या मिनिटास स्कॉट नेव्हिल याने नोंदविलेल्या गोलमुळे ईस्ट बंगालने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सला 1-1 गोलबरोबरीत रोखले. या दोन्ही संघातील सामना शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. 90+5 व्या मिनिटास ब्राईट एनोबाखारे याच्या कॉर्नर किकवर ऑस्ट्रेलियन नेव्हिलने भेदक हेडिंग साधत केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला चकविले. त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्याच जॉर्डन मरे याने सामन्याच्या 64व्या मिनिटास केलेल्या गोल केल्यामुळे केरळा ब्लास्टर्सने आघाडी घेतली होती.

बरोबरीमुळे रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगाल संघ सलग सहाव्या सामन्यात अपराजित राहिला. त्यांची ही एकदंरीत पाचवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 11 लढतीतून 11 गुण झाले असून नववा क्रमांक कायम आहे. केरळा ब्लास्टर्सची ही चौथी बरोबरी ठरली. त्यांचे 11 लढतीनंतर 10 गुण झाले असून दहाव्या क्रमांकात फरक पडलेला नाही. केरळा ब्लास्टर्स व ईस्ट बंगाल यांच्यातील पहिल्या टप्प्यातील लढतही बरोबरीत राहिली होती.

सामन्याच्या पूर्वार्धात एकही गोल झाला नाही, मात्र प्रतिस्पर्धी गोलरक्षकांना एकाग्रता साधावी लागली. केरळा ब्लास्टर्सने आक्रमणावर जास्त भर दिला होता, पण त्यांच्या गॅरी हूपर व जॉर्डन मरे यांना यश लाभले नाही. ईस्ट बंगालच्या ब्राईट एनोबाखारे यालाही अचूक नेमबाजी साधता आली नाही.

गोलशून्य बरोबरीची कोंडी अखेर केरळा ब्लास्टर्सचा ऑस्ट्रेलियन आघाडीपटू जॉर्डन मरे याने भेदली. केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याच्याकडून मिळालेल्या चेंडूवर मरे याने ईस्ट बंगालच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत गोलरक्षक देबजित मजुमदार याला चकविले. त्यापूर्वी विश्रांतीनंतर दहाव्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सच्या गॅरी हूपरचा फटका किंचित हुकला होता, त्यामुळे त्यांना आघाडी मिळाली नव्हती.

दृष्टिक्षेपात...

- जॉर्डन मरे याचे मोसमातील 11 सामन्यात 6 गोल

- मरे याचे सर्व 6 गोल उत्तरार्धातील खेळात

- पहिल्या टप्प्यातही केरळा ब्लास्टर्स व ईस्ट बंगालमध्ये 1-1 गोलबरोबरी

- स्कॉट नेव्हिल याचा आयएसएलमध्ये 1 गोल

- ईस्ट बंगाल सलग 6 लढतीत अपराजित, 2 विजय, 4 बरोबरी

- केरळा ब्लास्टर्सवर प्रतिस्पर्ध्यांचे सर्वाधिक 20 गोल

संबंधित बातम्या