आयएसएल : मुंबई सिटीस हैदराबादकडून प्रतिकार अपेक्षित

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

लोबेरांच्या मार्गदर्शनाखालील संघ सलग नऊ सामने अपराजित

पणजी : सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटी संघ सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग नऊ सामने अपराजित आहे, त्यापैकी आठ लढतीत ते विजयी ठरले. पाच गुणांच्या आघाडीसह अग्रस्थानी असलेल्या या मातब्बर संघास हैदराबाद एफसीकडून प्रतिकार अपेक्षित आहे, कारण मान्युएल मार्किझ यांच्या संघाने मागील दोन सामन्यांत गोलधडाका राखला.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर शनिवारी (ता. 16) होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. मुंबई सिटीने पूर्ण तीन गुणांची कमाई केल्यास ते दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानवर तब्बल आठ गुणांची आघाडी घेतील. चौथ्या क्रमांकावरील हैदराबादने धक्कादायक विजयाची नोंद केल्यास त्यांना तिसऱ्या स्थानावरील एफसी गोवास गाठणे शक्य होईल. सध्या प्रत्येकी 10 सामन्यानंतर मुंबई सिटीचे 25, तर हैदराबादचे 15 गुण आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीने हैदराबादला नमविले होते.

Khashaba Jadhav Birth Anniversary: 'ऑलिम्पिक'साठी ठेवलं होतं घर गहाण!

जमशेदपूरविरुद्धच्या गोलबरोबरीनंतर मुंबई सिटीने ओळीने चार सामने जिंकले आहेत. पहिल्या टप्प्यातील अखेरच्या लढतीत त्यांनी एटीके मोहन बागानला एका गोलने हरविले. दुसरीकडे हैदराबादने अगोदरच्या दोन लढतीत अनुक्रमे चेन्नईयीन एफसी (4-1) व नॉर्थईस्ट युनायटेड (4-2) या संघांना हरविले आहे. हैदराबादने फॉर्म कायम राखल्यास मुंबई सिटीस शनिवारी संघर्ष करावा लागेल. रेड कार्डमुळे एका सामन्याचे निलंबन संपवून अहमद जाहू मुंबई सिटीच्या निवडीसाठी उपलब्ध असेल.  मध्यरक्षक ह्यूगो बुमूस पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. मुंबई सिटीने स्पर्धेत सर्वाधिक 17 गोल केले आहेत, त्यापैकी 10 गोल ॲडम ली फाँड्रे व बार्थोलोमेव ओगबेचे या आघाडीपटूंनी एकत्रितपणे नोंदविले आहेत. मुंबई सिटीचा बचाव मजबूत आहे, त्यांनी फक्त चार गोल स्वीकारले आहेत.

हैदराबादची आक्रमणातील मदार अर्थातच आरिदाने सांताना याच्यावर असेल. जोएल चियानेज यालाही फॉर्म गवसला आहे, तर मागील लढतीत बदली खेळाडू लिस्टन कुलासोने दोन गोल केले होते. मात्र तुलनेत हैदराबादचा बचाव कमजोर असल्यामुळे त्यांना मुंबई सिटीच्या आक्रमणांपासून सावध राहावे लागेल.

 

संघाच्या कामगिरीवर लोबेरा खूष

‘‘आतापर्यंतच्या निकालावर मी खूष आहे. ही स्थिती कायम राखणे कठीण असते. आमच्यासाठी गुणतक्ता नव्हे, तर कामगिरीत प्रगती साधणे महत्त्वाचे आहे,’’ असे मुंबई सिटीचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी शुक्रवारी सांगितले. ‘‘माझ्या खेळाडूंच्या कामगिरीने आनंदित असून त्यांचा अभिमान वाटतो. कमी कालावधीत आमच्या शैलीची अंमलबजावणी करणे सोपे नाही. आम्हाला करंडक जिंकायचे असल्यास, संपूर्ण मोसमात आमच्या भारतीय खेळाडूंचा दर्जा उंचावलेला राखणे आवश्यक आहे,’’ असे स्पॅनिश प्रशिक्षक म्हणाले. 

 

दृष्टिक्षेपात...

- पहिल्या टप्प्यात वास्को येथे मुंबई सिटीची हैदराबादवर 2-0 फरकाने मात

- मुंबई सिटीचा ॲडम ली फाँड्रे व हैदराबादचा आरिदाने सांताना यांचे प्रत्येकी 6 गोल

- स्पर्धेत मुंबई सिटीच्या 6, तर हैदराबादच्या 2 क्लीन शीट्स

- स्पर्धेत मुंबई सिटीचे 17, तर हैदराबादचे 15 गोल

- मुंबई सिटीच्या ह्युगो बुमूस याचे स्पर्धेत सर्वाधिक 5 असिस्ट
 

संबंधित बातम्या