ISL 2020-21 एफसी गोवासाठी नव्वद मिनिटे महत्त्वाची सलग नऊ सामने अपराजित संघाची चेन्नईयीनविरुद्ध लढत

 ISL 2020-21 एफसी गोवासाठी नव्वद मिनिटे महत्त्वाची  सलग नऊ सामने अपराजित संघाची चेन्नईयीनविरुद्ध लढत
ISL2020-21 Ninety minutes crucial for FC Goa Nine unbeaten matches against Chennai

पणजी ः अगोदर काय घडले याचा विचार न करता, पुढील सामन्यातील नव्वद मिनिटे महत्त्वाची मानून एफसी गोवा संघ मैदानात उतरणार आहे, पूर्ण तीन गुणांचेच लक्ष्य राहील, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी शुक्रवारी सांगितले. सातव्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेत त्यांचा शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध सामना होईल. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत एफसी गोवाने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यास त्यांचा प्ले-ऑफ फेरीचा दावा जास्तच भक्कम होईल. ते सध्या नऊ सामने अपराजित आहेत. पहिल्या टप्प्यात चेन्नईयीनकडून पराभव पत्करल्यानंतर एफसी गोवाने एकही सामना गमावलेला नाही. अपराजित मालिकेत त्यांनी तीन सामने जिंकले असून सहा बरोबरी आहेत.

एफसी गोवासाठी बाकी चारही सामने एकप्रकारे ‘फायनल’ असतील. एफसी गोवाचे सध्या 16 सामन्यातून 23 गुण आहेत. तिसरा क्रमांक राखण्यासाठी त्यांना विजय अत्यावश्यक ठरेल. साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसी आव्हान साखळी फेरीत गारद होण्याच्या दिशेने आहे. त्यांचे 17 लढतीतून 17 गुण असून ते सध्या आठव्या क्रमांकावर आहेत.

सर्वोत्तम संघावर भर

‘‘चेन्नईयीनविरुद्धच्या सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखण्याच्या उद्देशाने खेळू. त्यासाठी सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ निवडण्यावर भर राहील,’’ असे फेरांडो म्हणाले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चेन्नईयीनने एफसी गोवास नमविले होते, पण त्या निकालास महत्त्व न देता स्पॅनिश प्रशिक्षक म्हणाले, की ‘‘तेव्हा सलग सामन्यांमुळे आमचा संघ दमला होता. आता मानसिकता बदलली आहे. पूर्वीपेक्षा संघ जास्त सक्षम असून सज्ज आहे.’’ मागील लढतीतील दोन गोलांच्या पिछाडीवरून एफसी गोवाने मुंबई सिटीस 3-3 गोलबरोबरीत रोखले होते. त्यांची ती स्पर्धेतील सलग पाचवी बरोबरी ठरली. एक गुण मिळाला, तरी त्या निकालाने संघाचा आत्मविश्वास उंचावल्याचे फेरांडो यांनी मान्य केले. निर्णायक गोल केलेला ईशान पंडिता याला संघात सुरवातीपासून खेळविण्यात ते अजून अनुकूल नाहीत.

चेन्नईयीन सहा सामने विजयाविना

चेन्नईयीन एफसी संघ सलग सहा सामने विजयाविना आहे. सदोष नेमबाजी हे चेन्नईयीनचे मुख्य दुखणे आहे. मागील लढतीत त्यांना जमशेदपूरने एका गोलने हरविले. गतवेळचे उपविजेते आणि दोन वेळा स्पर्धा जिंकलेल्या संघाचे तीन सामने बाकी आहेत. अखेरच्या टप्प्यात विजयी कामगिरी नोंदवून प्रतिष्ठा जपण्यावर त्यांचा भर राहील. संघ संधी गमावत असल्याची खंत लाझ्लो यांना आहे. ‘‘जमशेदपूरविरुद्ध स्वयंगोल स्वीकारल्यामुळे पराभूत व्हावे लागले. ही बाब खूप वेदनादायी ठरली, कारण संघाला गोल करण्याच्या आणि जिंकण्याची चांगली संधी होती. आता आम्हाला बाकी तिन्ही लढतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. गोवा संघाविरुद्ध पूर्ण ताकदीने उतरून, आम्ही अजूनही चांगला संघ आहोत हे सिद्ध करावे लागेल,’’ असे लाझ्लो म्हणाले.

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे चेन्नईयीनची एफसी गोवावर 2-1 मात

- एफसी गोवाचे स्पर्धेत 24 गोल, मुंबई सिटीनंतर (25) क्रम

- एफसी गोवाच्या सलग 9 अपराजित लढतीतील 6 पैकी 5 बरोबरी लागोपाठ

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे 11 गोल, तर आल्बर्टो नोगेराच्या 7 असिस्ट

- मागील 6 लढतीत चेन्नईयीनचा विजय नाही, 3 बरोबरी व 3 पराभव

- चेन्नईयीनचे 6 सामने गोलशून्य बरोबरीत

- एफसी गोवा, तसेच चेन्नईयीनच्या स्पर्धेत 8 बरोबरी

- एकमेकांविरुद्ध आयएसएल स्पर्धेत 18 लढती, एफसी गोवाचे 9, तर चेन्नईयीनचे 8 विजय, 1 बरोबरी
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com