ISL2020-21 एफसी गोवास दोन वेळा पिछाडीवरून बरोबरीत रोखले

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

एफसी गोवाने दोन वेळा पेनल्टी स्वीकारण्याची चूक केल्यामुळे आघाडी घेऊनही सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत त्यांना सलग चौथ्या सामन्यात एका गुणावर समाधान मानावे लागले.

पणजी: एफसी गोवाने दोन वेळा पेनल्टी स्वीकारण्याची चूक केल्यामुळे आघाडी घेऊनही सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत त्यांना सलग चौथ्या सामन्यात एका गुणावर समाधान मानावे लागले. नॉर्थईस्ट युनायटेडने फेडेरिको गालेगोच्या अचूक नेमबाजीमुळे पिछाडीवरून येत 2-2 अशी गोलबरोबरी साधली.

रंगतदार ठरलेला सामना गुरुवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. एफसी गोवास 21व्या मिनिटास अलेक्झांडर जेसूराज याने आघाडी मिळवून दिली, त्यानंतर 41व्या मिनिटास उरुग्वेयन फेडेरिको गालेगो याने पेनल्टी फटक्यावर नॉर्थईस्टला बरोबरी साधून दिली. बदली खेळाडू 20 वर्षीय अमरजित सिंग याने एफसी गोवातर्फे पहिला सामना खेळताना 80व्या मिनिटास शानदार हेडिंग साधले असता नॉर्थईस्टच्या गुरजिंदर कुमारच्या स्वयंगोलमुळे गोव्याच्या संघाला आघाडी मिळाली, मात्र 83व्या मिनिटास गालेगो याने दुसऱ्यांदा पेनल्टीवर गोल नोंदवून नॉर्थईस्टला पुन्हा बरोबरी साधून दिली. यावेळी गोलरक्षक धीरज सिंगने फटका अडविला होता, पण चेंडू ऐनवेळी त्याच्या हातून सुटला.

सलग तीन विजयानंतर नॉर्थईस्ट युनायटेडने बरोबरी नोंदविली. त्यांची एकंदरीत सातवी बरोबरी ठरली. त्यांचे आणि एफसी गोवाचे समान 22 गुण झाले आहेत. हैदराबादचेही तेवढेच गुण आहेत. मात्र गोलसरासरीत एफसी गोवा (+5) तिसऱ्या, हैदराबाद (+4) चौथ्या, तर नॉर्थईस्ट (+1) पाचव्या क्रमांकावर आहे. एफसी गोवाचीही ही सातवी बरोबरी ठरली. पहिल्या टप्प्यातही गोवा आणि नॉर्थईस्ट यांच्यातील सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला होता.

आल्बर्टो नोगेराच्या असिस्टवर जेसूराज याने एफसी गोवाचे गोलखाते उघडले. एफसी गोवाने रचलेल्या आक्रमणावर नॉर्थईस्ट युनायटेडचा अंदाज चुकला. चेंडू मैदानावर गेल्याचे जाणून गुवाहाटीच्या संघातील बचावपटू सुस्त राहिले, त्याचा लाभ उठवत नोगेराने चेंडूवर ताबा राखत जेसूराजला आयएसएलमधील पहिला गोल नोंदविण्याची संधी प्राप्त करून दिली. तमिळनाडूतील खेळाडूने नॉर्थईस्टचा कर्णधार-गोलरक्षक सुभाशिष रॉयला याला चकविले.

विश्रांतीस चार मिनिटे असताना गालेगो याने पेनल्टी अचूकपणे मारत गोलरक्षक धीरज सिंग याचा अंदाज चुकविला. लुईस माशादो याला पेनल्टी क्षेत्रात मागून रोखण्याची आल्बर्टो नोगेराची चूक नॉर्थईस्टसाठी फायद्याची ठरली, त्यामुळे त्यांना पेनल्टीवर बरोबरी साधता आली. त्यापूर्वी चार मिनिटे अगोदर, आदिल खानच्या टॅकलवर देशॉर्न ब्राऊस मैदानावर पडला असता रेफरीने नॉर्थईस्टला पेनल्टी फटका दिला नव्हता.

INDvsENG Test Series : पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात; इंग्लंडचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय -

पुन्हा गोल बरोबरी

सामन्याची दहा मिनिटे बाकी असताना होर्गे ओर्तिझच्या कॉर्नर किकवर अमरजितने हेडिंग साधले. यावेळी चेंडू नॉर्थईस्टच्या गुरजिंदर कुमार याच्या छातीला आपटून नेटमध्ये गेला व स्वयंगोलची नोंद झाली. तीन मिनिटानंतर एफसी गोवाच्या इव्हान गोन्झालेझने नॉर्थईस्टच्या आशुतोष मेहता याला रोखण्याच्या प्रयत्नात पेनल्टी क्षेत्रात पाडले. गालेगोच्या पेनल्टी फटक्यावर गोलरक्षक धीरजने अचूक अंदाज मिळवत चेंडूवर ताबा मिळविला होता, पण गालेगोच्या फटक्यातील ताकद वरचढ ठरली.

सेरिटनकडे नेतृत्व

एफसी गोवास 35व्या मिनिटास पहिला बदल करावा लागला. मध्यरक्षक प्रिन्सटन रिबेलो जायबंदी झाल्यामुळे खेळण्यास असमर्थ ठरला. त्याची जागा ग्लेन मार्टिन्स घेतली. एफसी गोवातर्फे त्याचा हा पहिलाच आयएसएल सामना ठरला. निलंबित कर्णधार एदू बेदियाच्या याच्या अनुपस्थितीत एफसी गोवाचे कर्णधारपद अनुभवी बचावपटू सेरिटन फर्नांडिसने सांभाळले.

गोवा प्रोफेशनल लीग : पिछाडीवरून एफसी गोवा डेव्हलपमेंटलची बाजी -

दृष्टिक्षेपात...

  • - एफसी गोवाच्या अलेक्झांडर जेसूराज याचा 14 आयएसएल लढतीत 1 गोल
  • - एफसी गोवाचा मध्यरक्षक आल्बर्टो नोगेराचे स्पर्धेत 6 असिस्ट, मुंबई सिटीच्या ह्यूगो बुमूसशी बरोबरी
  • - नॉर्थईस्ट युनायटेडच्या फेडेरिको गालेगोचे यंदा 10 लढतीत 4 गोल
  • - एकंदरीत गालेगो याचे 41 आयएसएल लढतीत 9 गोल
  • - एफसी गोवा व नॉर्थईस्ट यांच्यातील 14 लढतीत 7 बरोबरी
  • - एफसी गोवा व नॉर्थईस्टचे समान 21 गोल
     

संबंधित बातम्या