आयएसएल २०२०: अनुभवी ब्रँडन मध्यफळीतील आधारस्तंभ

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

ब्रँडन यंदा एफसी गोवा संघातर्फे आयएसएल स्पर्धेतील चौथा मोसम खेळणार आहे. २०१७-१८ मोसमापासून तो गोव्यातील संघातून  खेळत असून आतापर्यंत ५० आयएसएल सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे.

पणजी: आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाची स्थानिक फुटबॉलपटूंवर भिस्त असेल, त्यात लेनी रॉड्रिग्ज, ब्रँडन फर्नांडिस आदी अनुभवी खेळाडू आधारस्तंभ असतील.

ब्रँडन यंदा एफसी गोवा संघातर्फे आयएसएल स्पर्धेतील चौथा मोसम खेळणार आहे. २०१७-१८ मोसमापासून तो गोव्यातील संघातून  खेळत असून आतापर्यंत ५० आयएसएल सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. या कालावधीत त्याने ५ गोल नोंदवून, १५ असिस्टची नोंद केली आहे. एफसी गोवा संघातून खेळताना तो २०१९ मध्ये सुपर कपचा, तर २०१९-२० मोसमात लीग शिल्ड विनर्स किताबाचा मानकरी ठरला.

ब्रँडनच्या आयएसएल कारकिर्दीचा प्रारंभ मुंबई सिटी एफसी संघातून झाला, पण दुखापतींच्या ससेमिऱ्यामुळे त्याला विशेष संधी मिळाली नाही. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली तीन मोसमात एफसी गोवाच्या मध्यफळीतील हुकमी खेळाडू ठरला. एफसी गोवा संघाचे नवे स्पॅनिश प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्यासाठीही २६ वर्षीय ब्रँडन आगामी मोसमात महत्त्वाचा खेळाडू असेल. २०१५ पासून त्याने आयएसएल स्पर्धेत सामन्यांचे अर्धशतक (५२) नोंदविले आहे. साळगावकर एफसीकडून युवा कारकिर्दीस सुरवात केल्यानंतर १० वर्षांपूर्वी ब्रँडनला दक्षिण आफ्रिकेतील एएसडी केपटाऊन अकादमीत संधी मिळाली. तेथे पाच वर्षे व्यतित केल्यानंतर त्याने युरोपातील संघांसाठी चाचणी दिली, पण निवड होऊ शकली नाही. मायदेशी परतल्यानंतर त्याने स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाशी करार केला. नंतर भारतीय फुटबॉलमध्ये मुंबई सिटी एफसी, मोहन बागान, चर्चिल ब्रदर्स असा प्रवास करून तो तीन वर्षांपूर्वी एफसी गोवा संघात दाखल झाला आणि आता तेथेच स्थिरावला आहे. २०२२ पर्यंत तो आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेत्या संघाशी करारबद्ध आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या