आयएसएल 2020: एफसी गोवा संघात स्पॅनिश खेळाडूंचे वर्चस्व

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

भारतीय खेळाडू वगळता, एफसी गोवा संघात प्रथमच परदेशातील एकाच देशाचे जास्त खेळाडू करारबद्ध आहेत. त्यामुळे आयएसएलच्या सातव्या मोसमात एफसी गोवा संघात स्पॅनिश शैली दिसण्याचे संकेत आहेत.

पणजी: आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघ मैदानावर खेळताना स्पॅनिश वर्चस्व अनुभवायला मिळणार आहे. या संघातील आतापर्यंतचे पाचही परदेशी फुटबॉलपटू स्पेनचे नागरीक आहेत.

भारतीय खेळाडू वगळता, एफसी गोवा संघात प्रथमच परदेशातील एकाच देशाचे जास्त खेळाडू करारबद्ध आहेत. त्यामुळे आयएसएलच्या सातव्या मोसमात एफसी गोवा संघात स्पॅनिश शैली दिसण्याचे संकेत आहेत.

आगामी मोसमासाठी एफसी गोवाने ३१ वर्षीय स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याचा करार २०२२ पर्यंत वाढविला आहे. यंदा तो या संघातर्फे सलग चौथा मोसम खेळेल. तो आतापर्यंत आयएसएल स्पर्धेत ५१ सामने खेळला असून ९ गोल नोंदविले आहेत. एफसी गोवाच्या नव्या स्पॅनिश फुटबॉलपटूंत ३६ वर्षीय आघाडीपटू इगोर आंगुलो, २८ वर्षीय विंगर जॉर्ज ऑर्टिझ, ३० वर्षीय बचावपटू इव्हान गोन्झालेझ आणि ३० वर्षांचा मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा यांचा समावेश आहे. २०१९-२० मोसमात ला-लिगा २ स्पर्धेत सीडी न्युमान्सिया संघाचे १,०३२ मिनिटे प्रतिनिधित्व करून नोगेरा एफसी गोवा संघात दाखल झाला आहे. संघाचे नवे प्रशिक्षक ३९ वर्षीय ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचेच देशवासीय असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीकडे एफसी गोवा संघाच्या चाहत्यांचे लक्ष असेल. विशेष म्हणजे, सारे नवे परदेशी खेळाडू भारतात प्रथमच खेळत आहेत. एफसी गोवा संघात लवकरच आशियाई खेळाडूला संधी मिळू शकते.

एदू बेदिया वगळता एफसी गोवा संघातील इतर सर्व स्पॅनिश खेळाडू भारतीय वातावरणात नवखे आहेत. गतमोसमात खेळलेल्या एफसी गोवाच्या परदेशी खेळाडूंपैकी फेरान कोरोमिनास या स्पॅनिश आघाडीपटूचा करार वाढविण्यात आला नाही. स्पेनचा बचावपटू कार्लोस पेना निवृत्त झाला आहे. अन्य खेळाडूंत मोरोक्कोचा अहमद जाहू, सेनेगलचा मुर्तदा फॉल यांनी मुंबई सिटी संघाशी करार केला आहे. फ्रेंच मध्यरक्षक ह्यूगो बुमूसही मुंबई सिटीत दाखल झाला आहे. गतमोसमात सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघात स्पेनमधील तिघे जण होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या