ISL2020-21: नॉर्थईस्टसाठी आणखी एक `फायनल` केरळा ब्लास्टर्सला नमविल्यास प्ले-ऑफ फेरीतील जागा पक्की

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

नॉर्थईस्ट युनायटेडसाठी केरळा ब्लास्टर्सविरुद्धचा सामना एक प्रकारे फायनल`च असेल.

पणजी : नॉर्थईस्ट युनायटेडसाठी केरळा ब्लास्टर्सविरुद्धचा सामना एक प्रकारे फायनल`च असेल. त्यांनी शुक्रवारी विजयी कामगिरी केल्यास सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीतील जागा पक्की होईल.

नॉर्थईस्ट युनायटेड आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सामना वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. नॉर्थईस्ट युनायटेडचे सध्या 30 गुण आहेत. शेवटच्या साखळी लढतीत विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाल्यास 33 गुणांसह त्यांना एटीके मोहन बागान व मुंबई सिटीनंतर गुणतक्त्यात तिसरा क्रमांक मिळेल आणि प्ले-ऑफ फेरीत खेळण्याचा मान मिळेल. केरळा ब्लास्टर्सने विजय मिळविला किंवा सामना बरोबरीत राहिल्यास नॉर्थईस्टला रविवारी होणाऱ्या एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी यांच्यातील सामन्यापर्यंत वाट पाहावी लागेल. एफसी गोवाचेही नॉर्थईस्टइतकेच 30 गुण आहेत, तर हैदराबादने 28 गुणांची कमाई केली आहे. सध्या एफसी गोवाचा +8, नॉर्थईस्ट युनायटेडचा +4, तर हैदराबादचा +8 गोलफरक आहे. खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेड संघ सलग नऊ सामने अपराजित आहे. मागील काही लढतीतील कामगिरी पाहता, केरळा ब्लास्टर्सविरुद्ध गुवाहाटीच्या संघाचे पारडे जड असेल.

ISL 2020-21 : मुंबई सिटीच्या धडाक्यासमोर ओडिशा गारद

केरळा ब्लास्टर्ससाठी स्पर्धेतील शेवटचा सामना केवळ प्रतिष्ठेच्या दृष्टीनेच महत्त्वाचा आहे. त्यांच्या खाती फक्त 17 गुण असून ते दहाव्या क्रमांकावर आहेत. सलग सात सामने त्यांना विजय नोंदविता आलेला नाही. नॉर्थईस्टच्या आक्रमक खेळासमोर केरळा ब्लास्टर्सच्या कमजोर बचावाची परीक्षा लागेल, त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत तब्बल 34 गोल स्वीकारले आहेत.

I-League : झुनिगाच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सचा नेरोका एफसीवर निसटती मात

दृष्टिक्षेपात...

- नॉर्थईस्ट युनायटेडची कामगिरी : 19 सामने, 7 विजय, 9 बरोबरी, 3 पराभव, 30 गुण

- केरळा ब्लास्टर्सची कामगिरी : 19 सामने, 3 विजय, 8 बरोबरी, 8 पराभव, 17 गुण

- नॉर्थईस्ट युनायटेडचे सलग 9 अपराजित सामन्यात 5 विजय, 4 बरोबरी

- केरळा ब्लास्टर्स 7 सामने विजयाविना, या कालावधीत 4 बरोबरी, 3 पराभव

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे केरळा ब्लास्टर्सची नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध 2-2 गोलबरोबरी

संबंधित बातम्या