ISL2020-21 एटीके मोहन बागानला एएफसी चँपियन्स लीगची संधी; ईस्ट बंगालची प्रतिष्ठा पणास

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

कोलकाता डर्बीचे महत्त्व लक्षात घेता ईस्ट बंगाल विजयासाठी आटोकाट प्रयत्न करेल.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएलएस) फुटबॉल स्पर्धेतील दुसरी कोलकाता डर्बी शुक्रवारी (ता. 19) रंगणार आहे, त्यावेळी एटीके मोहन बागान एएफसी चँपियन्स लीग संधी साधण्याच्या प्रयत्नात असेल, तर ईस्ट बंगाल प्रतिष्ठेसाठी खेळेल. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणारी ही लढत कोलकात्यातील फुटबॉलप्रेमींसाठी उत्सुकतेची असेल. आयएसएलमधील पहिल्या कोलकाता डर्बीत गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरला वास्को येथे एटीके मोहन बागानने 2-0 फरकाने विजय नोंदविला होता.

एटीके मोहन बागान सध्या स्पर्धेत 36 गुणांसह अव्वल आहे. त्यांनी सलग चार सामने जिंकले आहेत. प्ले-ऑफ फेरी निश्चित झाल्याने अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघ दबावविरहीत आहे. मात्र बाकी तिन्ही सामन्यात सरस कामगिरी करून त्यांनी मुंबई सिटीवर आघाडी कायम राखल्यास हा संघ लीग विनर्स शिल्डचा मानकरी ठरेल आणि त्यामुळे पुढील मोसमातील एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी थेट पात्रताही मिळेल. एटीके मोहन बागानचा बचाव स्पर्धेत सर्वोत्तम गणला जातो. 17 पैकी 10 सामन्यांत त्यांनी एकही गोल स्वीकारलेला नाही, त्यामुळे ईस्ट बंगालसमोर कठीण आव्हान असेल.

ISL2020-21 : एफसी गोवाचा ओडिशावर दमदार विजय; गुणतक्त्यात चौथ्या स्थानी झेप 

ईस्ट बंगाल संघाचे 17 लढतीतून 17 गुण असून ते नवव्या क्रमांकावर आहेत. बाकी तिन्ही सामने जिंकले, तरी त्यांना प्ले-ऑफची संधी नाही. आता प्रतिष्ठेसाठी हा संघ स्पर्धेत खेळेल. कोलकाता डर्बीचे महत्त्व लक्षात घेता ईस्ट बंगाल विजयासाठी आटोकाट प्रयत्न करेल, तसेच पहिल्या टप्प्यातील पराभवाचा वचवा काढण्याचेही त्यांचे उद्दिष्ट्य राहील. ईस्ट बंगालचे स्पर्धेतील पंचगिरीशी अजिबात जमलेले नाही. स्पर्धेतील पंचगिरीवर टीका केल्यामुळे त्यांचे मुख्य प्रशिक्षक रॉबी फावलर सध्या निलंबित आहेत, तर सहाय्यक प्रशिक्षक टोनी ग्रँट यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

दृष्टिक्षेपात...

- एटीके मोहन बागानची कामगिरी : 17 सामने, 11 विजय, 3 बरोबरी, 3 पराभव

- ईस्ट बंगालची कामगिरी : 17 सामने, 3 विजय, 8 बरोबरी, 6 पराभव

- एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जच्या स्पर्धेत सर्वाधिक 10 क्लीन शीट्स

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाचे स्पर्धेत सर्वाधिक 13 गोल

- एटीके मोहन बागानचे 23, तर ईस्ट बंगालचे 15 गोल

- स्पर्धेत एटीके मोहन बागानवर सर्वांत कमी 10 गोल

संबंधित बातम्या