ISL2020-21: गोवा आणि मुंबईसाठी अंतिमपूर्व `फायनल'

 ISL202021 Final for Goa and Mumbai
ISL202021 Final for Goa and Mumbai

पणजी : लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या मुंबई सिटीने दोन वेळा पिछाडीवर पडल्यानंतरही एफसी गोवास बरोबरीत रोखल्यामुळे आता सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढत दोन्ही संघांसाठी अंतिमपूर्व `फायनल`च ठरली आहे. विजय नोंदविणारा संघ विजेतेपदासाठी दावा सांगू शकेल, पु्न्हा बरोबरी झाल्यास पेनल्टी शूटआऊटवर भवितव्य ठरेल. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर सोमवारी  होणारा सामना उत्कंठावर्धक असेल.

महत्त्वपूर्ण सामन्यासाठी तयारी करत असताना, दोन टप्प्यातील उपांत्य फेरी लढतीदरम्यान विश्रांतीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याबद्दल एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यातील पहिल्या टप्प्यातील सामना झाला, आता लगेच दोन दिवसांनंतर आणखी निर्णायक सामना खेळावा लागत असल्याने फेरांडो यांनी नापसंती प्रदर्शित केली. खेळाडूंची तंदुरुस्ती एफसी गोवास सतावत आहे.

``मी नाराज आहे. आणखी विश्रांती आवश्यक होती. हा मोसम प्रत्येकासाठी खूपच खडतर ठरला आहे. गेल्या रविवारी आम्ही हैदराबादविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळलो, शुक्रवारी मुंबई सिटीविरुद्ध लढत झाली, आता लगेच पुन्हा खेळावे लागत आहे. खेळाडू दमले आहेत, आम्हाला नियोजनासाठीही पुरेसा वेळ मिळालेला नाही,`` असे फेरांडो रविवारी आभासी पत्रकार परिषदेत म्हणाले. वेळापत्रकावर टीका केलेली असली, तरी फेरांडो यांनी मुंबई सिटीस सोमवारी नमविण्याची व्यूहरचना तयार केली आहे. खेळावर नियंत्रण राखत, प्रगती साधत विजयासाठी अंतिम फेरी गाठण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

विजय अत्यावश्यक 

फातोर्डा येथे उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात 2-2 गोलबरोबरीमुळे एफसी गोवा, तसेच मुंबई सिटीसाठी गोलसरासरीवर आगेकूच राखण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात विजय अत्यावश्यक आहे. यंदा अवे गोल नियम नसल्यामुळे पुन्हा बरोबरी झाल्यास कोंडी पेनल्टी शूटआऊटवर फुटू शकते. ``आम्ही पेनल्टीचा सराव केला आहे, तरीही निर्धारित वेळेतच निकाल लागावा अशी अपेक्षा आहे. पेनल्टी हा एकप्रकारे नशीबाचा भाग असतो,`` असे फेरांडो म्हणाले. पहिल्या टप्प्यातील निलंबित असलेले बचावपटू इ्व्हान गोन्झालेझ व मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा हे प्रमुख खेळाडू एफसी गोवासाठी सोमवारच्या लढतीत उपलब्ध असतील, मात्र मागील लढतीत मुंबई सिटीच्या मुर्तदा फॉल याच्या अतिशय धोकादायक टॅकलने जायबंदी झालेला मध्यरक्षक प्रिन्सटन रिबेलो बाकी लढतीस मुकला आहे. फॉल याला रेड कार्ड न दिल्याबद्दल रेफरीच्या निर्णयावर टीका झाली आहे. एफसी गोवास दुखापतीमुळे सेरिटन फर्नांडिसची अनुपस्थिती जाणवू शकते.

मुंबई दबावाविना खेळणार

पहिल्या टप्प्यात एफसी गोवाने बरोबरीत रोखले, तरी सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीस अजिबात कमी लेखता येणार नाही. विशेषतः हा संघ सेटपिसेसवर गोल करण्यात पटाईत आहे आणि अशाप्रकारच्या व्यूहरचनेत एफसी गोवाचा बचाव कोलमडतो. त्याचा लाभ मुंबई सिटीस मिळू शकतो. आपला संघ सोमवारी दबावाविना खेळेल, असे लोबेरा यांनी नमूद केले. एएफसी चँपियन्स लीगची लक्ष्यप्राप्ती केल्यानंतर संघ प्ले-ऑफचा आनंद लुटत असून आता करंडक जिंकण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात संघाने गोल करण्याचा आणखी संधी गमावल्याबद्दल आणि सामन्यात काही वेळ नियंत्रण गमावल्यामुळे लोबेरा यांनी नाराजी व्यक्त केली. मागील लढतीत एफसी गोवाविरुद्धच्या वादग्रस्त टॅकलमुळे चर्चेत असलेल्या मुर्तदा फॉलची त्यांनी पाठराखण केली.

दृष्टिक्षेपात गोवा-मुंबई लढत

- आयएसएलमध्ये यापूर्वी 17 वेळा आमने-सामने, एफसी गोवा 7, तर मुंबई सिटी 5 लढतीत विजयी, 5 बरोबरी

- एकमेकांविरुद्ध एफसी गोवाचे 38, तर मुंबई सिटीचे 20 गोल

- 2018-19 मधील प्ले-ऑफ लढतीत एफसी गोवाची मुंबई सिटीवर 5-2 गोलफरकाने मात, पहिल्या टप्प्यात एफसी गोवाचा 5-1, तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई सिटीचा 1-0 फरकाने विजय

आयएसएलच्या सातव्या मोसमात

- मुंबई सिटीचे 37, तर एफसी गोवाचे 33 गोल

- मुंबई सिटीने 20, तर एफसी गोवाने 25 गोल स्वीकारले

- मुंबई सिटीच्या 12  विजयांच्या तुलनेत एफसी गोवा 7 लढतीत विजयी

- एफसी गोवाच्या 11, तर मुंबई सिटीच्या 5 बरोबरी

- एफसी गोवाचे 3, तर मुंबई सिटीचे 4 पराभव

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे 14, मुंबई सिटीच्या एडम ली फाँड्र याचे 11 गोल

- एफसी गोवा सलग 14 सामने अपराजित, 5 विजय, 9 बरोबरी

यंदा मोसमातील अगोदरच्या लढतीत

- 25 नोव्हेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे मुंबई सिटी 1-0 विजयी

- 8 फेब्रुवारी 2021 रोजी बांबोळी येथे 3-3 गोलबरोबरी

- 5 मार्च 2021 रोजी फातोर्डा येथे 2-2 गोलबरोबरी
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com