आयएसएल स्पर्धेचे गोव्यात ११५ सामने

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

गोव्यातील तीन स्टेडियमवर जैवसुरक्षा वातावरणात येत्या २० नोव्हेंबरपासून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा सातवा मोसम रंगणार आहे. स्पर्धेतील एकूण ११५ सामने राज्यात खेळले जातील. 

पणजी :  गोव्यातील तीन स्टेडियमवर जैवसुरक्षा वातावरणात येत्या २० नोव्हेंबरपासून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा सातवा मोसम रंगणार आहे. स्पर्धेतील एकूण ११५ सामने राज्यात खेळले 
जातील. 

स्पर्धेतील पहिल्या लढतीत तीन वेळच्या विजेत्या एटीके मोहन बागान संघासमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान असेल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील ११ फेऱ्यांचे वेळापत्रक स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांनी शुक्रवारी जाहीर केले. सामने बांबोळी येथील जीएमसी ॲथलेटिक्स स्टेडियम, फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदान स्टेडियमवर प्रेक्षकांविना खेळले जातील. एटीके मोहन बागान व केरळा ब्लास्टर्स यांच्यातील २० नोव्हेंबरला होणारा पहिला सामना बांबोळी येथे होईल. स्पर्धेच्या अकराव्या फेरीतील शेवटचा सामना ११ जानेवारीस होईल. एफसी गोवाचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला होईल.

फातोर्डा येथे त्यांच्यासमोर माजी विजेत्या बंगळूर एफसीचे आव्हान असेल.
आशियाई फुटबॉलमधील सर्वांत जुनी आणि ऐतिहासिक असलेली कोलकाता डर्बी टिळक मैदान स्टेडियमवर २७ नोव्हेंबरला होईल. त्यादिवशी एटीके मोहन बागानसमोर एससी ईस्ट बंगालचे आव्हान असेल. ईस्ट बंगाल यंदा आयएसएल स्पर्धेत पदार्पण करत असून मोहन बागानचे एटीके संघात विलगीकरण झाले आहे. एफसी गोवा, बंगळूर एफसी, चेन्नईयीन एफसी, केरळा ब्लास्टर्स, मुंबई सिटी एफसी, ओडिशा एफसी, जमशेदपूर एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड व हैदराबाद एफसी हे स्पर्धेतील अन्य संघ आहेत. एटीकेने तीन वेळा, चेन्नईयीन एफसीने दोन वेळा, तर बंगळूर एफसीने एकवेळ स्पर्धा जिंकली आहे.

गतमोसमात साखळी फेरीत अव्वल राहत एफसी गोवा संघाने लीग शिल्डसह एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती.
स्पर्धेतील बाकी ५५ साखळी लढतींचे वेळापत्रक डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात येईल. आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) स्पर्धा कॅलेंडर स्पष्ट झाल्यानंतर बाकी लढतींचे वेळापत्रक ठरविण्यात 
येईल.

एफसी गोवाची मोहीम २२ नोव्हेंबरपासून
तारीख               विरुद्ध                        स्थळ 
२२ नोव्हेंबर     बंगळूर एफसी               फातोर्डा 
२५ नोव्हेंबर     मुंबई सिटी                    फातोर्डा 
३० नोव्हेंबर     नॉर्थईस्ट युनायटेड           फातोर्डा
६ डिसेंबर      केरळा ब्लास्टर्स                फातोर्डा
१२ डिसेंबर     ओडिशा एफसी               बांबोळी
१६ डिसेंबर     एटीके मोहन बागान         फातोर्डा
१९ डिसेंबर     चेन्नईयीन एफसी             फातोर्डा
२३ डिसेंबर     जमशेदपूर एफसी            वास्को
३० डिसेंबर     हैदराबाद एफसी             वास्को
६ जानेवारी     ईस्ट बंगाल                     वास्को

दृष्टिक्षेपात सातवी आयएसएल...
  २०२०-२१ मोसमात ११ संघांत चुरस.

एकूण ११५ लढती, गतमोसमात ९५ सामने.

सर्व ११ संघांचे द्विसाखळी पद्धतीने सामने गुणतक्त्यातील पहिले चार संघ प्ले-ऑफसाठी पात्र

 पहिल्या ११ फेऱ्यांत ६ डबल हेडर

सामने संध्याकाळी ७.३० वाजता

डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना संध्याकाळी ५ वाजता

संबंधित बातम्या