स्मिथ, वॉर्नरचे असणे हे आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नरच्या सहभागामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला असला तरी भारतीय गोलंदाजांच्या क्षमतेविषयी चेतेश्वर पुजाराला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच २०१८-१९ च्या मालिकेतील यशाची पुनरावृत्ती भारतीय संघ करेल असे पुजाराला वाटते. 

नवी दिल्ली :  स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नरच्या सहभागामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला असला तरी भारतीय गोलंदाजांच्या क्षमतेविषयी चेतेश्वर पुजाराला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच २०१८-१९ च्या मालिकेतील यशाची पुनरावृत्ती भारतीय संघ करेल असे पुजाराला वाटते. 

ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करून भारताने तब्बल ७१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यात पुजाराने तीन शतकांसह पाचशेपेक्षा अधिक धावा केल्या होत्या. मात्र, या मालिकेत स्मिथ व वॉर्नर बॉल कुरतडल्याच्या प्रकरणामुळे खेळू शकले नव्हते. २०१८-१९ चा विचार केला तर आता ऑस्ट्रेलियाची फलंदाजी थोडी मजबूत वाटत आहे. मात्र, विजय सहजासहजी मिळत नाही. कारण तुम्हाला भारताबाहेर जिंकायचे असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल, असे पुजारा म्हणाला. तो म्हणाला जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि महम्मद शमी हे त्रिकूट १८-१९ प्रमाणे पुन्हा एकदा चमत्कार करतील. 

स्मिथ, वॉर्नर आणि मार्कस लॅबुशनगे हे खूप महान खेळाडू आहेत, यात शंका नाही. पण यापूर्वीच्या मालिकेत खेळलेले भारतीय गोलंदाजच पुन्हा यावेळीही खेळत आहे आणि त्यात कोणताही फरक पडलेला नाही, असे पुजाराने स्पष्ट केले. पहिली कसोटी विद्युतझोतात गुलाबी चेंडूने खेळविण्यात येणार आहे. याविषयी पुजारा म्हणाला, हे एक आव्हान आहे.

 

संबंधित बातम्या