"अंतिम फेरी गाठली नाही हे लज्जास्पद"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

आयपीएलची अंतिम फेरी सनरायजर्स हैदराबादने गाठली नाही, हे लज्जास्पद आहे, अशी टिप्पणी संघाचा अव्वल फलंदाज केन विलियमसन याने केली; मात्र त्याने खराब सुरुवातीनंतर प्ले ऑफमधील प्रवेशही मोलाचा असल्याचे मत व्यक्त केले.

अबुधाबी : आयपीएलची अंतिम फेरी सनरायजर्स हैदराबादने गाठली नाही, हे लज्जास्पद आहे, अशी टिप्पणी संघाचा अव्वल फलंदाज केन विलियमसन याने केली; मात्र त्याने खराब सुरुवातीनंतर प्ले ऑफमधील प्रवेशही मोलाचा असल्याचे मत व्यक्त केले.

विलियमसनच्या आक्रमक ६७ धावानंतरही हैदराबादला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या क्वालिफायर - दोनमध्ये पराभव पत्करावा लागला. दिल्लीने १७ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती. दिल्लीचा हा सात सामन्यांतील केवळ दुसरा विजय होता, तर सलग पाच विजयानंतर हैदराबादला हार पत्करावी लागली. 

दिल्लीचा संघ चांगला आहे; पण त्यांचा सूर हरपला होता. आमच्यासारखी विजयी मालिका सुरू करण्यासाठी ते प्रयत्नांची शर्थ करीत होते. आम्ही गेल्या सामन्यात झुंजार खेळ करून खूप काही साधले होते. तेच दिल्लीने नेमके आमच्याविरुद्ध केले, असे विलियमसनने सांगितले. धावांचा पाठलाग करताना धोका पत्करणे भाग असते. आमची सुरुवात चांगली झाली नाही; पण डावाच्या मध्यास चांगली भागीदारी करून आम्ही आव्हान निर्माण केले होते. आम्हाला विजयाची संधी होती. अंतिम फेरी गाठू शकलो नाही, याची लाज वाटत आहे; पण गेल्या तीन आठवड्यात आमच्या संघाकडून अभिमानास्पद कामगिरीच झाली होती, असेही त्याने सांगितले. 

स्पर्धेच्या पूर्वार्धात सनरायजर्सच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता; पण विलियमसनच्या मते चुरशीच्या लढतीत आम्ही हरत होतो. त्या वेळी सर्वोत्तम कामगिरी घडत नव्हती. या स्पर्धेत प्रत्येक संघाने अन्य संघास हरवले आहे. त्यामुळे सातत्याने सर्वोत्तम कामगिरी आवश्‍यक होती. ती साधण्यास आम्हाला वेळ लागला. मोक्‍याच्या क्षणी हे साधले, यापेक्षा जास्त वाटचाल केली असती, तर ते जास्त चांगले झाले असते, असेही न्यूझीलंड कर्णधाराने सांगितले.

आयपीएलचा हा मोसम खूपच चुरशीचा आणि रंगतदार झाला. या मोसमात अनुभवी तसेच नवोदित खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. नवोदितांना चांगली संधी लाभली. त्याचा फायदा केवळ त्यांनाच नव्हे, तर संघालाही झाला. 
- केन विलियमसन

संबंधित बातम्या