एटीके मोहन बागानची आयएसएलमधील अपराजित मालिका खंडित ; व्हॅल्सकिसमुळे जमशेदपूरची सनसनाटी

गोमन्तक वृत्तसंस्था
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

 स्ट्रायकर नेरियूस व्हॅल्सकिस याने सामन्याच्या दोन्ही अर्धात भेदक हेडिंग साधले, त्या बळावर जमशेदपूर एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात काल सनसनाटी निकाल नोंदवत पहिल्या विजयाची नोंद केली.

पणजी :   स्ट्रायकर नेरियूस व्हॅल्सकिस याने सामन्याच्या दोन्ही अर्धात भेदक हेडिंग साधले, त्या बळावर जमशेदपूर एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात काल सनसनाटी निकाल नोंदवत पहिल्या विजयाची नोंद केली. कोलकात्याच्या एटीके मोहन बागानची अपराजित मालिका खंडित करताना स्टील सिटीतील संघाने 2-1 फरकाने सामना जिंकला.

 

सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. नेरियूस व्हॅल्सकिस याने अनुक्रमे 30 व 66व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. एटीके मोहन बागानची पिछाडी रॉय कृष्णा याने 80व्या मिनिटास कमी केली. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरच्या शानदार सेट पिसेस व्यूहरचनेत एटीके मोहन बागानचा बचाव पूर्णतः कोलमडून गेला. पिछाडी एका गोलने कमी केल्यानंतर एटीके मोहन बागानने अखेरच्या दहा मिनिटात बरोबरीसाठी बरेच प्रयत्न केले, पण जमशेदपूरचा बचाव तोडणे शक्य झाले नाही.

 

जमशेदपूरने तीन लढतीनंतर प्रथमच पूर्ण तीन गुण प्राप्त केले. त्यांचे आता एकूण पाच गुण झाले आहेत. त्यांना सातवा क्रमांक मिळाला आहे. सलग तीन विजयानंतर पराभूत झालेल्या एटीके मोहन बागानचे नऊ गुण कायम राहिले. मुंबई सिटी एफसीइतकेच त्यांचे गोल असले, तरी गोलसरासरीत अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील  संघ गोलसरासरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या नेरियूस व्हॅल्सकिसने दोन्ही गोल सेट पिसेसवर नोंदविले. दोन्ही वेळेस त्याचे हेडिंग थोपविणे एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जा याच्यासाठी अशक्य ठरले. गतमोसमात चेन्नईयीन एफसीकडून खेळताना गोल्डन बूटचा मानकरी ठरलेल्या लिथुआनियाच्या आक्रमक खेळाडूने संधीचे सोने केले. याशिवाय उत्तरार्धात फ्रीकिक फटका गोलरक्षक अरिंदमने रोखल्यामुळे व्हॅल्सकिस यंदाच्या पहिल्या हॅटट्रिकला मुकला. त्याचे यंदाच्या स्पर्धेत एफसी गोवाच्या इगोर आंगुलोइतकेच पाच गोल झाले आहेत.

 

सामना संपण्यास दहा मिनिटे असताना फिजी देशाच्या रॉय कृष्णा याने मानवीर सिंगच्या असिस्टवर एटीके मोहन बागानची पिछाडी एका गोलने कमी केली. यावेळी लाईनमनने ऑफसाईडकडे दुर्लक्ष केल्याचा लाभ कृष्णाला मिळाला.

 

 

300व्या मिनिटास स्वीकारला गोल

एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जा याची गोलनेटसमोरील अभेद्य तटबंदी अखेर सोमवारी भेदली गेली. आयएसएलच्या सातव्या मोसमात अरिंदमने तीनशेव्या मिनिटास गोल स्वीकारला. लिथुआनियन नेरियूस व्हॅल्सकिस याने 30व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे जमशेदपूरने आघाडी घेत, एटीके मोहन बागानला जबरदस्त धक्का दिला. सेट पिसेसवर कोलकात्याच्या संघाचा बचाव कोलमडला. ऐतॉर मॉनरॉय याच्या कॉर्नरवर व्हॅल्सकिसने उंचावत साधलेला हेडर खूपच भेदक ठरला. त्यानंतर दोन मिनिटांनी जमशेदपूरला आघाडी वाढविण्याची सुरेख संधी होती, मात्र जॅकिचंद सिंगच्या क्रॉस पासवर व्हॅल्सकिसचा हेडर गोलरक्षक अरिंदमने उजव्या बाजूने पूर्णपणे शरीर ताणत संघाची पिछाडी एका गोलपुरती मर्यादित ठेवली. जमशेदपूरने आघाडी घेण्यापूर्वी एक मिनिट अगोदर प्रीतम कोटलच्या दक्षतेमुळे एटीके मोहन बागानवरील संकट टळले होते. जमशेदपूरचा कर्णधार पीटर हार्टली याचा हेडर कोटलने गोललाईनवरून फोल ठरविला.

 

दृष्टिक्षेपात...

- नेरियूस व्हॅल्सकिस याचे यंदाच्या स्पर्धेत 5 गोल, आयएसएलमध्ये एकूण 20 गोल

- गतमोसमातील सलग 2 पराभवानंतर जमशेदपूरचा कोलकात्यातील प्रतिस्पर्ध्यांवर विजय

- रॉय कृष्णाचे यंदाच्या आयएसएलमध्ये 4 गोल, आयएसएलमधील एकूण गोलसंख्या 19

- जमशेदपूरचे 303, तर एटीके मोहन बागानचे 325 पास

 

अधिक वाचा:

मुंबई सिटीची विजयी हॅटट्रिक ; आयएसएलच्या कालच्या सामन्यात ओडिशा एफसीवर दोन गोलनी सहज मात 

संबंधित बातम्या