कोल्हापूरच्या अनिकेतमुळे जमशेदपूरने मारली बाजी.. गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडची विजयी मालिका खंडित

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 डिसेंबर 2020

कोल्हापूरचा वीस वर्षीय स्ट्रायकर अनिकेत जाधव याने उत्तरार्धात नोंदविलेल्या शानदार गोलमुळे जमशेदपूर एफसीने सलग दोन बरोबरीनंतर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल विजयाची चव चाखली.

पणजी :  कोल्हापूरचा वीस वर्षीय स्ट्रायकर अनिकेत जाधव याने उत्तरार्धात नोंदविलेल्या शानदार गोलमुळे जमशेदपूर एफसीने सलग दोन बरोबरीनंतर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल विजयाची चव चाखली. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडची अपराजित मालिका खंडित करताना सामना 1-0 फरकाने जिंकला. पेनल्टी फटका गमावणे गुवाहाटीच्या संघाला चांगलेच महागात पडले. सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. अनिकेतने 53व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. सामन्याच्या 66व्या मिनिटास जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याने अचूक अंदाज बांधत नॉर्थईस्ट युनायटेडच्या इद्रिसा सिला याचा पेनल्टी फटका अडविला, त्यामुळे स्टील सिटीतील संघाची आघाडी अबाधित राहिली.

 

जमशेदपूरने सात लढतीतील दुसरा विजय नोंदविला. अन्य चार बरोबरी आणि एका पराभवासह त्यांचे आता 10 गुण झाले आहेत. स्पर्धेतील पहिल्याच पराभवामुळे जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडचे 10 गुण कायम राहिले. आजच्या लढतीपूर्वी त्यांनी दोन विजय व चार बरोबरीची नोंद केली होती. गोलसरासरीत नॉर्थईस्ट युनायटेड चौथ्या, तर जमशेदपूर एफसी पाचव्या क्रमांकावर आहे. आघाडीपटू अनिकेत जाधव याने विश्रांतीनंतरच्या आठव्या मिनिटास प्रशिक्षक ओवेन कॉयल यांचा विश्वास सार्थ ठरविला. प्रतिस्पर्धी गोलरक्षक गुरमीत सिंग याचा बचाव सणसणीत फटक्यावर भेदत त्याने जमशेदपूरला आघाडी मिळवून दिली. भारताच्या या ज्युनियर आंतरराष्ट्रीय खेळाडूचा आयएसएलमधील दुसरा गोल ठरला. गतमोसमातही त्याने गोल केला होता. विंगर जॅकिचंद सिंगने रचलेल्या चालीवर अनमार्क असलेल्या अनिकेतने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला सावरण्याची संधीच दिली नाही. त्यानंतर तीन मिनिटांनी अनिकेतचा आणखी एक सोलो प्रयत्न असफल ठरला.

 

तासाभराच्या खेळानंतर नॉर्थईस्ट युनायटेडला बरोबरी साधण्याची सुवर्णसंधी होती, पण इद्रिसा सिला याचा डाव्या पायाचा पेनल्टी फटका जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याने अचूक अंदाज बांधत अडविला. केरळमधील रेहेनेशने आपल्या डावीकडे अचूकपणे झेपावत नॉर्थईस्टला बरोबरी साधण्यापासून रोखले. गोलक्षेत्रात जमशेदपूरच्या स्टीफन इझे याने नॉर्थईस्टच्या बेंजामिन लँबॉट याला पाडल्यानंतर रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली होती. सामन्याच्या पूर्वार्धात स्टीफ इझे याचा हेडर अचूक ठरला असता, तर जमशेदपूरला गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडता आली असती. मागील लढतीत रेड कार्ड मिळालेल्या ऐतॉर मॉनरॉय याची अनुपस्थिती जाणवणार नाही याची दक्षता जमशेदपूरने घेतली. बचावफळीत कर्णधार पीटर हार्टली व स्टीफन इझे यांनी यांनी नॉर्थईस्टच्या आक्रमणावर कडक पहारा ठेवला.

 

दृष्टिक्षेपात...

- जमशेदपूर एफसीकडून सलग दुसरा आयएसएल मोसम खेळणाऱ्या अनिकेत जाधवचे 20 सामन्यात 2 गोल, गतमोसमात हैदराबादविरुद्ध गोल

- गतमोसमात 13 सामन्यात 1 गोल, यंदा 7 सामन्यात 1 गोल

- जमशेदपूरचे आता यंदाच्या स्पर्धेत 8 गोल, नॉर्थईस्टचेही तेवढेच गोल

- नॉर्थईस्टविरुद्ध गतमोसमातील 2 बरोबरीनंतर जमशेदपूर विजयी
 

संबंधित बातम्या