गतविजेत्या बंगळूरचा आयएसएलमध्ये सलग दुसरा पराभव ; जमशेदपूरने दिला 1-0 फरकाने धक्का

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

नायजेरियन बचावपटू स्टीफन एझे याचे हेडिंग 79व्या मिनिटास भेदक ठरल्यामुळे जमशेदपूर एफसीला सोमवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या बंगळूर एफसीला 1-0 फरकाने धक्का देणे शक्य झाले.

पणजी : नायजेरियन बचावपटू स्टीफन एझे याचे हेडिंग 79व्या मिनिटास भेदक ठरल्यामुळे जमशेदपूर एफसीला काल इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या बंगळूर एफसीला 1-0 फरकाने धक्का देणे शक्य झाले. विजयी संघाने आता तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली आहे. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरचा हा नऊ सामन्यातील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता 13 गुण झाले असून त्यांचा आता मुंबई सिटी व एटीके मोहन बागान (प्रत्येकी 16 गुण) यांच्यानंतर क्रम आहे. बंगळूरला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आठ लढतीनंतर 12 गुण कायम राहिले. त्यांची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. सामना संपण्यास अकरा मिनिटे बाकी असताना नायजेरियन स्टीफन एझे याच्या अचूक हेडिंगमुळे जमशेदपूरला आघाडी संपादता आली. अनिकेत जाधवच्या असिस्टवर 26 वर्षीय बचावपटूने झेपावत चेंडूला हेडिंगने नेटची दिशा दाखविली, यावेळी चेंडू अडविताना सहकारी खेळाडूचा अडथळा आल्याने बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू पूर्णतः हतबल ठरला.

सामन्याच्या पहिल्या पंचेचाळीस मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडता आली नाही. बंगळूर एफसीच्या खेळाडूंनी आक्रमकतेवर भर दिला, परंतु जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याला चकवा देणे त्यांना जमले नाही. अर्ध्या तासाच्या खेळानंतर रेहेनेशने अप्रतिम गोलरक्षण करताना जमशेदपूरवरील संकट टाळले. अगोदर त्याने बंगळूरच्या क्लेटन सिल्वा याचा प्रयत्न उधळल्यानंतर रिबाऊंडवर पुन्हा दक्षता प्रदर्शित केली. त्यापूर्वी जॅकिचंद सिंगच्या असिस्टवर नेरियूस व्हॅल्सकिस अचूक फटका मारू शकला नाही, त्यामुळे जमशेदपूरला आघाडीपासून वंचित राहावे लागले. सव्विसाव्या मिनिटास जमशेदपूरची आघाडी एक संधी हुकली. स्टीफन एझे याचा फटका बंगळूरच्या दिमास देल्गाडो याने गोलरेषेजवळून विफल ठरविला. तासाभराच्या खेळानंतर जमशेदपूरचे सेट पिसेस आक्रमण अयशस्वी ठरले. फ्रीकिकवर पीटर हार्टलीचा फटका गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने रोखल्यानंतर रिबाऊंडवर स्टीफन एझे याच्या प्रयत्न बंगळूरच्या राहुल भेकेने उधळून लावला. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना गोलरक्षक रेहेनेश याने बंगळूरच्या राहुल भेके याचा हेडर वेळीच अडविल्यामुळे जमशेदपूरची आघाडी अबाधित राहिली. त्यापूर्वी तीन मिनिटे अगोदर महंमद मोबाशीर याचा सणसणीत फटका लक्ष्य साधून न शकल्यामुळे जमशेदपूरची आघाडी वाढू शकली नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- जमशेदपूरच्या स्टीफन एझे याचे यंदाच्या स्पर्धेतील 9 सामन्यात 3 गोल

- जमशेदपूरचे स्पर्धेत एकूण 10 गोल

- जमशेदपूरच्या मोसमात 3 क्लीन शीट

- बंगळूर यंदा 3 सामन्यात गोल नोंदविण्यात अपयशी

संबंधित बातम्या