पोलिस तपासाची मागणी `जीएफए`ने फेटाळली

पोलिस तपासाची मागणी `जीएफए`ने फेटाळली
goa-football-association.

पणजी,

 गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत हेराफेरीचा संशय असलेल्या गतमोसमातील सहा सामन्यांचा तपास पोलिसांमार्फत करण्याची मागणी गोवा फुटबॉल संघटनेच्या (जीएफए) काही व्यवस्थापकीय समिती सदस्यांची केली, पण ती फेटाळली गेली. त्याऐवजी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

जीएफएच्या पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्तीच्या निर्णयास व्यवस्थापकीय समितीची संमती असल्याचे जीएफएचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी सांगितले. गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत १६ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत झालेल्या सहा सामन्यांत हेराफेरी सूचक संशयास्पद बेटिंग पद्धतीचा वापर झाल्याचा अहवाल आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जीएफएने चौकशी समिती नियुक्त करण्याचे ठरविले आहे.

निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्याच्या निर्णय व्यवस्थापकीस समितीने अभिसरण पद्धतीने घेतल्याचे अध्यक्ष आलेमाव यांनी सांगितले. अध्यक्षांनी मांडलेल्या या प्रस्तावास संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष लव्हिनियो रिबेलो, उपाध्यक्ष अँथनी पांगो, सदस्य दिओनिझियो डायस, डॉमनिक परेरा, ग्रेगरी डिसोझा, जॉन फर्नांडिस, मॉरिसियो आल्मेदा, फ्रान्सिस नुनीस, जॉन सिल्वा, कॉस्मे ऑलिव्हेरा, जाजू फर्नांडिस, जुझे सांतारिटा कुएल्हो (बाबुश) यांनी पाठिंबा दर्शविला.

जीएफए व्यवस्थापकीय समितीचे सदस्य बाबली मांद्रेकर, जोनाथन डिसोझा, प्रकाश देसाई यांनी याप्रकरणी पोलिस गुन्हा विभागाकडे तक्रार नोंदविण्याची मागणी केली, तर वेल्विन मिनेझिस यांनी पोलिस तक्रार नोंदविल्यानंतर अंतर्गत चौकशी करून अहवाल पोलिसांना सादर करण्याचे सुचविले.

संपादन - तेजश्री कुंभार 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com