ICC Test Rankings : जो रूटची तिसऱ्या स्थानी झेप; तर कोहलीची घसरण 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज कसोटीतील ताज्या फलंदाज आणि गोलंदाजांची यादी जाहीर केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज कसोटीतील ताज्या फलंदाज आणि गोलंदाजांची यादी जाहीर केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्याचा आणि पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दोन कसोटी सामन्यांचा परिणाम या क्रमवारीवर झाला आहे. चेन्नईत झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या जो रूटने फलंदाजांच्या यादीतील टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पाकिस्तान संघाचा खेळाडू बाबर आझमनेही फलंदाजीच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली आहे. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची घसरण झाली आहे. 

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर देखील आयसीसीच्या ताज्या आकडेवारीत विराट कोहली एका अंकाने घसरून पाचव्या स्थानावर पोहचला आहे. न्यूझीलंड संघाचा फलंदाज केन विल्यम्सन फलंदाजांच्या यादीत 919 अंकांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ देखील 891 अंकांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. मात्र आता इंग्लंड संघाचा फलंदाज जो रूटने दोन स्थानाची वाढत घेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जो रूटचे 883 अंक झाले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा लबूशेन तिसऱ्या स्थानावरून चौथ्या नंबरवर आणि विराट कोहली चौथ्या अंकावरून पाचव्या स्थानी घसरला आहे. 

INDvsENG 'जो रूट'ला टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑटोग्राफ केलेली जर्सी का...

याशिवाय, भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारादेखील एका अंकाने घसरून सातव्या पोहचला आहे. तर पाकिस्तान संघाचा बाबर आझमने एका स्थानाची उडी घेत सहावे स्थान गाठले आहे. त्यानंतर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा फलंदाजांच्या टॉप टेन मधून बाहेर फेकला गेला आहे. आणि इंग्लंड संघाचा बेन स्टोक्स दहाव्या स्थानावरून नवव्या क्रमांकावर पोहचला आहे. 

तसेच, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या आणि इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात आपल्या फिरकीची जादू करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने गालंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा नोंदविली आहे. रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या यादीत आठव्या क्रमांकावरून सातव्या स्थानावर पोहचला आहे. रविचंद्रन अश्विनचे ७७१ अंक झालेले आहेत. यासोबतच टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रित बुमराहने देखील एका स्थानाची झेप घेत नवव्या स्थानावरून आठव्या नंबरवर उडी घेतली आहे. जसप्रित बुमराहचे 769 गुण झाले आहेत. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियन संघाचा पॅट कमिन्स 908 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर इंग्लंड संघाचा स्टुअर्ट ब्रॉड 830 गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. आणि इंग्लंड संघाच्याच जेम्स अँडरसनने पाचव्या नंबरवरून थेट तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.      

संबंधित बातम्या