फुटसालवर जोशुआ यांचे गोवा, महाराष्ट्रातील प्रशिक्षकांना मार्गदर्शन

dainik gomantak
शनिवार, 9 मे 2020

गत आठवड्यात जोशुआ यांचे वेबिनार मार्गदर्शन सत्र झाले. त्यात गोव्यातील साठपेक्षा जास्त, तर महाराष्ट्रातील २६० पेक्षा जास्त फुटसाल प्रशिक्षकांनी भाग घेतल्याची माहिती जोशुआ यांनी दिली. 

पणजी, 

 कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागते, जमावबंदी आहे, त्या पार्श्वभूमीवर आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) मान्यताप्राप्त मार्गदर्शन जोशुआ वाझ यांनी फुटसाल प्रशिक्षण वेबिनार घेतले. त्यात गोवा आणि महाराष्ट्रातील प्रशिक्षकांनी भाग घेतला आहे.

गत आठवड्यात जोशुआ यांचे वेबिनार मार्गदर्शन सत्र झाले. त्यात गोव्यातील साठपेक्षा जास्त, तर महाराष्ट्रातील २६० पेक्षा जास्त फुटसाल प्रशिक्षकांनी भाग घेतल्याची माहिती जोशुआ यांनी दिली. ``गोवा आणि महाराष्ट्रातील फुटबॉल प्रशिक्षकांशी संवाद साधताना खूपच छान अनुभव मिळाला. त्यांना फुटसालविषयी योग्य आणि अचूक ज्ञान देण्यासाठी चांगले व्यासपीठ लाभले,`` असे जोशुआ यांनी सांगितले. अखिल भारतीय फुटबॉल प्रशिक्षक आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घेतलेल्या वेबिनार सत्रात जोशुआ यांनी फुटसालविषयक प्रबोधन केले.  त्यांनी सांगितले, की ``चांगला फुटबॉलपटू बनण्यासाठी फुटसालद्वारे वाट गवसते, असं मला वाटतं. खेळाचे योग्य ज्ञान आणि शिक्षण महत्त्वाचे आहे.``

मडगाव येथील चौगुले महाविद्यालय मैदानावर सुरू असलेल्या यूथ फुटसाल अकादमीचे ३० वर्षीय जोशुआ सहमालक आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये भारताचे १६ वर्षांखालील वयोगटात प्रतिनिधित्व केले आहे. ते देशातील एकमेव लेव्हल-१ फुटसाल मार्गदर्शक आहेत. या अभ्यासक्रमात ते या वर्षी फेब्रुवारीत उत्तीर्ण झाले. ते माजी व्यावसायिक फुटबॉलपटू असून आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. २००७-०८ मोसमात त्यांनी पोर्तुगालमधील व्हितोरिया द ग्यूमारेज क्लबसमवेत सराव केला होता.

फातोर्डा येथील रहिवासी असलेल्या जोशुआ यांनी मुंबईत फुटबॉलला पाठबळ देणारे महाराष्ट्राचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख केला. आदित्य पश्चिम भारत फुटबॉल संघटनेचे (विफा) पदाधिकारी आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सहकार्यामुळे भारतीय उपखंडात फुटसाल खेळ भरारी घेईल, अशी आशा जोशुआ यांनी व्यक्त केली.

 

संबंधित बातम्या