कळंगुटचा धेंपो क्लबला पराभवाचा धक्का

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

कळंगुटला आघाडी मिळवून देताना सिद्धांतने धेंपो क्लबच्या गोलक्षेत्रात जबरदस्त मुसंडी मारली.

पणजी : कळंगुट असोसिएशनने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबला पराभवाचा धक्का दिला. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर कळंगुटच्या संघाने 2-1 फरकाने बाजी मारली. कळंगुट असोसिएशनला पूर्ण तीन गुण मिळवून देणारे दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. सिद्धांत शिरोडकरने 27व्या, तर कौमे ज्युनियर याने 34व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला. बदली खेळाडू सूरज हडकोणकर याने 86व्या मिनिटास थेट फ्रीकिक फटक्यावर धेंपो क्लबची पिछाडी एका गोलने कमी केली. 

ISL 2020-21: मुंबई सिटीस खुणावतोय करंडक; आयएसएल विजेतेपदासाठी एटीके मोहन...

मागील लढतीत वास्को क्लबला हरविलेल्या कळंगुट असोसिएशनचा हा सलग दुसरा विजय ठरला. कळंगुटला आघाडी मिळवून देताना सिद्धांतने धेंपो क्लबच्या गोलक्षेत्रात जबरदस्त मुसंडी मारली. प्रतिस्पर्धी बचावपटू शालम पिरीस याला मागे टाकत त्याने चेंडूला नेटची दिशा दाखविली. अर्ध्या तासाच्या खेळानंतर कळंगुटच्या सिद्धार्थ कुंडईकर याने धेंपो क्लबचा शुभम मालवणकर याला गुंगारा देत कौमे याला सुरेख क्रॉस पास दिला. कळंगुटच्या परदेशी खेळाडूने पेनल्टी क्षेत्रातून चेंडूला अचूक दिशा दाखविताना धेंपो क्लबचा गोलरक्षक मेलरॉय फर्नांडिसचा बचाव भेदला. 
 

संबंधित बातम्या