अमेरीकेच्या टेबल टेनिसमध्ये भारतीय वंशाचा आवाज!

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

मेरिकेला टेबल टेनिसच्या विश्‍वात मानाचे स्थान मिळवून देणारा मूळचा भारतीय वंशाचा आहे.

अमेरिकेला टेबल टेनिसच्या विश्‍वात मानाचे स्थान मिळवून देणारा मूळचा भारतीय वंशाचा आहे. कनक झा या २० वर्षीय तरुणाने सध्या पुरुष एकेरीत जागतिक २५ व्या स्थानावर झेप घेतली आहे. अमेरिकेसाठी तोही एक विक्रम आहे. आता तो रिओ ऑलम्पिकच्या तयारीत आहे. 

गेल्या रिओ ऑलम्पिकमध्ये त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले. अमेरिकेतर्फे ऑलिम्पिकसाठी निवड होणारा तो सर्वांत लहान वयाचा टेबल टेनिसपटू ठरला. त्याने वयाच्या १४ व्या वर्षी जागतिक संघटनेच्या वर्ल्डकपमध्ये पदार्पण केले. कमी वयात पदार्पणचा तोही एक विक्रम आहे. २०१८ मध्ये झालेल्या यूथ ऑिलम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक पटकावले. अशा स्पर्धेतील अमेरिकेचे हे पहिलेवहिले पदक ठरले. त्या आधी तो सलग चार वर्षे अमेरिकन राष्ट्रीय पुरुष एकेरीचा विजेता आहे. पॅन अमेरिकन स्पर्धेतही तो एकेरी आणि दुहेरीचा कांस्यपदक विजेता आहे. यूथ ऑिलम्पिकमध्ये चीनच्या अव्वल खेळाडूकडून तो पराभूत झाला होता; पण या स्पर्धेने त्याचे टेबल टेनिसचे तंत्र अधिक सुधारत गेले. कठोर सराव, तंत्र आत्मसात करण्याची जिद्द यातून त्याने अमेरिकेच्या नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. 

त्याचा जन्म अमेरिकेतील मिल्पिटास येथे २००० मध्ये झाला. त्याची मोठी बहीण प्राची याच्यामुळे तो टेबल टेनिसकडे वळला गेला. आवड करिअर म्हणून पुढे आली आणि मग त्याने शालेय अभ्यास ऑनलाईन पद्धतीनेच सुरू केला. विशिष्ट वयानंतर अमेरिकन खेळाडू टेबल टेनिसच्या अधिक अभ्यासासाठी युरोप किंवा आशियाई देशात जातात; पण त्याने स्वीडनची वाट धरली. तेथील हॅमस्टॅड शहरात तो मोठी बहीण प्राचीसह दाखल झाला. तेथे त्याने खेळातील सुधारासाठी कठोर परिश्रम घेतले. त्याचा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत तीन सत्रांत विभागला गेला होता. शरीर घोटविणे, पायांची हालचाल गतिमान करणे, प्रतिक्रिया वाढविणे असाही त्याच्या सरावाचा भाग होता.

प्रशिक्षकांच्या प्रत्येक प्रयत्नाला त्याने तितकाच उत्तम प्रतिसाद दिला. परिणामी, त्याचे स्पीनवरील नियंत्रण, बॅकहॅण्ड आणि फोरहॅण्ड अशा साऱ्या गोष्टींमध्ये सुधारणा झाली. प्रामुख्याने चीन खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी त्याची सज्जता झाली. त्याचे त्याने प्रत्यंतर आपल्या पुढील प्रत्येक सामन्यातून दाखवून दिले. टेबल टेनिस हेच विश्‍व असलेल्या कनकला रिओनंतर टोकिओ ऑलिम्पिकमधून अधिक आशावाद आहे. टेबल टेनिसचे ऑलिम्पिक पदक देशाला मिळवून देण्याची त्याची जिद्द आहे.

संबंधित बातम्या