दुखापतीस नमवून कपिल सज्ज.

किशोर पेटकर
बुधवार, 29 जुलै 2020

एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाचा खेळाडू आशावादी

पणजी,

आघाडीपटू कपिल होबळे याच्या घोट्यास गतमोसमात गंभीर दुखापत झाली, मात्र एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाच्या खेळाडूने भक्कम मनोबलाच्या बळावर पुनरागमन केले. आशावादी दृष्टिकोनासह २२ वर्षीय फुटबॉलपटू नव्या मोसमासाठी सज्ज झाला आहे.

धेंपो स्पोर्टस क्लबतर्फे फुटबॉल कारकिर्दीची सुरवात केलेला कपिल एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाचा आधारस्तंभ आहे. हल्लीच संघाने त्याचा करार आणखी दोन वर्षांसाठी वाढविला आहे. दुखापतीवर योग्य उपचाराच्या बळावर मात करून त्याने पुनरागमन केले. नंतर द्वितीय विभागीय लीग स्पर्धेत संघाचे ४ सामन्यांत प्रतिनिधित्व करताना २ गोलही नोंदविले.

‘‘गतमोसमाच्या उत्तरार्धात मी दुखापतग्रस्त होतो. ती खरोखरच वाईट दुखापत होती, सुदैवाने फिजिओथेरपीच्या माध्यमातून क्लबची मदत लाभली. पुनर्वसन सत्रानंतर मी पुनरागमन करू शकलो,’’ असे कपिलने दुखापतीविषयी सांगितले. ‘‘दुखापतीतून परतल्यानंतर द्वितीय विभागीय स्पर्धेत केलेला गोल मी कधीच विसरू शकणार नाही,’’ असे हा युवा आघाडीपटू भावनिक होत म्हणाला. कपिलने एफसी गोवाच्या मुख्य संघात जागा मिळविण्याचे, तसेच राष्ट्रीय संघातून खेळण्याचे ध्येय बाळगले आहे.

 

कामगिरी उंचावण्यावर भर

इटलीतील युव्हेंट्स संघातून खेळणारा पोर्तुगीज आघाडीपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो कपिलसाठी आदर्शवत आहे. फुटबॉलमधील कारकिर्दीत कुटुंबीयांनी विशेषतः वडील आणि भावाने मोलाची साथ दिल्याचे त्याने नमूद केले. एफसी गोवा डेव्हलमेंट संघातील लिअँडर, प्रिन्सटन, नेस्टर व हेडन या सहकाऱ्यांचे सल्लेही मौल्यवान ठरले. त्यांच्या सूचना आत्मसात करून कामगिरी उंचावण्यासाठी उपयोगी ठरल्याचे त्याने सांगितले.  

 संपादन तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या