कवळेकर पहिले दृष्टिदोष बुद्धिबळ आर्बिटर

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

गोव्यातील ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक संजय कवळेकर जागतिक बुद्धिबळ महासंघाकडून (फिडे) मान्यता लाभलेले आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातील पहिले दृष्टिदोष आर्बिटर ठरले आहेत. 

पणजी : गोव्यातील ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक संजय कवळेकर जागतिक बुद्धिबळ महासंघाकडून (फिडे) मान्यता लाभलेले आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातील पहिले दृष्टिदोष आर्बिटर ठरले आहेत. 

या वर्षी जानेवारीत फिडेचे अध्यक्ष आर्काडी द्वोर्कोविच यांनी कवळेकर यांच्यात आंतरराष्ट्रीय आर्बिटर मान्यतेवर शिक्कामोर्तब केले होते. बुधवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशस्तिपत्रक देऊन कवळेकर यांना गौरविले. यावेळी गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी कवळेकर यांना नोबल जागतिक विक्रम प्रशस्तिपत्रक प्रदान केले. मुख्यमंत्र्यांनी कवळेकर यांच्या मेहनतीचे आणि दृढनिश्चयाचे कौतुक केले. 

नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये समावेश झालेले संजय कवळेकर हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातील पहिले दृष्टिदोष आर्बिटर ठरले आहेत. २००१ साली गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेत बुद्धिबळ प्रशिक्षक या नात्याने रुजू झाल्यानंतर कवळेकर २००४ साली राष्ट्रीय बुद्धिबळ आर्बिटर बनले. २०१८ साली त्यांना फिडेकडून आर्बिटर किताब मिळाला, तर २०२० साली त्यांना आंतरराष्ट्रीय आर्बिटर किताब बहाल करण्यात आला.

ते दृष्टिदोष बुद्धिबळातील माजी खेळाडू असून २०१८ साली त्यांनी पश्चिम विभागीय विजेतेपद मिळविले होते. दृष्टिदोषांच्या राष्ट्रीय ब आणि राष्ट्रीय अ स्पर्धेत ते खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय आर्बिटर बनण्यापर्यंतच्या प्रवासात सहकार्य लाभल्याबद्दल कवळेकर यांनी गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर, व्यवस्थापकीय समिती, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. राजा यांचे आभार मानले आहे.

संबंधित बातम्या