राष्ट्रीय सेलिंगसाठी किओना, पर्ल यांची निवड

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर सेलिंग स्पर्धेसाठी किओना रजनी आणि पर्ल कोलवाळकर महिला गटात गोवा यॉटिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धा २२ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत होईल.

पणजी : मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर सेलिंग स्पर्धेसाठी किओना रजनी आणि पर्ल कोलवाळकर महिला गटात गोवा यॉटिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धा २२ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत होईल.

राष्ट्रीय सेलिंग स्पर्धा मार्चमध्ये होणार होती, पण कोविड-१९ लॉकडाऊनमुळे ती लांबणीवर टाकण्यात आली होती. लॉकडाऊननंतरची देशातील ही पहिली सेलिंग स्पर्धा आहे.
किओना १७ वर्षांची आहे. ती आरएस:एक्स महिला गटात भाग घेईल. चौदा वर्षीय पर्ल हिचा लेझर रेडियल महिला गटात समावेश असेल. या गटातील पर्ल सर्वांत युवा स्पर्धक असेल. गोवा क्रीडा प्राधिकरणाचा सेलिंग प्रशिक्षक नसतानाही अतिशय मेहनत घेत किओना आणि पर्ल यांनी राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारल्याचे गोवा यॉटिंग असोसिएशनने पत्रकात नमूद केले आहे. 

दोन वर्षांपूर्वी जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले डेन कुएल्हो आणि कातिया कुएल्हो गोव्याचे आघाडीचे विंडसर्फर आहेत, पण दुखापतीमुळे त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेता येणार नाही. आणखी एक प्रतिभाशाली विंडसर्फर रसेल लोबो यालाही दुखापत झाली असून तो राष्ट्रीय स्पर्धेस मुकेल.
 

संबंधित बातम्या