केरळा ब्लास्टर्सचा विजयी जल्लोष ; हैदराबाद एफसीवर दोन गोलनी मात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

केरळा ब्लास्टर्सने अखेर रविवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात विजयाचा जल्लोष केला. अब्दुल हक्कू आणि जॉर्डन मरे यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर कोचीच्या संघाने हैदराबाद एफसीला 2-0 फरकाने हरविले.

पणजी :  केरळा ब्लास्टर्सने अखेर रविवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात विजयाचा जल्लोष केला. अब्दुल हक्कू आणि जॉर्डन मरे यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर कोचीच्या संघाने हैदराबाद एफसीला 2-0 फरकाने हरविले. सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. केरळा ब्लास्टर्सचे गोलखाते 29व्या मिनिटास बचावपटू अब्दुल हक्कू याने उघडले. 88व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने केरळा ब्लास्टर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला. केरळा ब्लास्टर्सचा हा सात लढतीतील पहिलाच विजय ठरला. किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आता सहा गुण झाले आहेत. ते आता नवव्या क्रमांकावर कायम आहेत. हैदराबाद एफसीला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. मान्यएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे सात लढतीतून नऊ गुण व आठवा क्रमांक कायम राहिले.

अब्दुल हक्कू याने सामन्याच्या 29व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. फाकुन्दो परेरा याने मारलेल्या कॉर्नर किकवर हक्कू याने अचूक हेडिंग साधत केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. यावेळी हैदराबादचा अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याला चेंडूचा अजिबात अंदाज आला नाही. विश्रांतीपूर्वी हैदराबादला बरोबरीची संधी होती, परंतु आशिष रायच्या असिस्टवर आरिदाने सांताना अचूक नेमबाजी साधू शकला नाही.  विश्रांतीनंतर केरळा ब्लास्टर्सच्या सहल अब्दुल समद याला दोन वेळा गोल करण्याची संधी होती, परंतु तो फटका मारताना एकाग्रता साधू शकला नाही. त्यानंतर सामना संपण्यास दहा मिनिटे असताना हैदराबादच्या हालिचरण नरझारी याने केरळाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली होती, परंतु त्याला यश न मिळाल्याने कोचीच्या संघाची आघाडी अबाधित राहिली.

 

दृष्टिक्षेपात...

- केरळा ब्लास्टर्सचा बचावपटू अब्दुल हक्कू याचा 12 आयएसएल लढतीत 1 गोल

- जॉर्डन मरे याचे यंदाच्या आयएसएल स्पर्धेत 2 गोल

- केरळा ब्लास्टर्सची मोसमात दुसरीच क्लीन शीट

 

...........................

संबंधित बातम्या