'आयएसएल'मध्ये बदली खेळाडूमुळे केरळा ब्लास्टार्सने ईस्ट बंगालला रोखले

गोम्तक वृ्त्तसेवा
सोमवार, 21 डिसेंबर 2020

सामन्याच्या इंज्युरी टाईममधील चौथ्या मिनिटास बदली खेळाडू जीकसन सिंग याने केलेल्या शानदार गोलमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल केरळा ब्लास्टर्सने पराभव टाळला.

पणजी : सामन्याच्या इंज्युरी टाईममधील चौथ्या मिनिटास बदली खेळाडू जीकसन सिंग याने केलेल्या शानदार गोलमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल केरळा ब्लास्टर्सने पराभव टाळला. स्वयंगोलनंतर त्यांनी ईस्ट बंगालला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. त्यामुळे दोन्ही संघ स्पर्धेत विजयाविना राहिले.सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. केरळा ब्लास्टर्सकडून खेळणारा बुर्किनो फासो देशाचा आंतरराष्ट्रीय बचावपटू बकारी कोने याच्या चुकीमुळे स्वयंगोल झाला आणि 13व्या मिनिटास ईस्ट बंगालला आघाडी मिळाली. इंज्युरी टाईममधील दोन मिनिटांचा खेळ बाकी असताना मणिपूरच्या १९ वर्षीय जीकसनचा हेडर ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार याच्यासाठी भेदक ठरला. तीन वर्षांपूर्वी जीकसनने १७ वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत भारतासाठी एकमेव गोल केला होता. फाकुन्दो परेराच्या कॉर्नर किकवर सहल अब्दुल समद याने दिलेल्या क्रॉसपासवर जीकसनने लक्ष्य साधले.

 

दोन्ही संघांना बरोबरीमुळे प्रत्येकी एक गुण मिळाला. रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालची ही दुसरी बरोबरी ठरली. त्यांचे सहा सामन्यानंतर दोन गुण झाले असून ते आता दहाव्या क्रमांकावर आले आहेत. किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सला तिसऱ्या लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यांचे आता सहा लढतीतून तीन गुण झाले आहेत. ते नवव्या क्रमांकावर कायम आहेत. स्वयंगोलमुळे ईस्ट बंगालला आघाडी मिळाली. ईस्ट बंगालच्या जॅक मघोमा याने रचलेल्या चालीवर महंमद रफीक याने केरळा ब्लास्टर्सच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली. त्यानंतर रफीकने अँथनी पिल्किंग्टन याच्या दिशेने चेंडू मारला. यावेळी फटका दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात बकारी कोने याच्या पायाला चेंडू आपटून केरळा ब्लास्टर्सच्या नेटमध्ये घुसला. त्यापूर्वी केरळा ब्लास्टर्सची संधी वाया गेली होती. कॉस्ता न्हामोईनेसू याचा हेडर गोलपट्टीवरून गेल्यामुळे ईस्ट बंगालचे नुकसान झाले नाही. पूर्वार्धातील खेळात केरळा ब्लास्टर्सने चेंडूवर जास्त प्रमाणात ताबा राखला, पण ईस्ट बंगालचा बचाव त्यांच्यासाठी भारी ठरला. सोळाव्या मिनिटास ईस्ट बंगालचा पिल्किंग्टन गोलरक्षक आल्बिनो गोम्सला चकवू शकला नाही.

 

उत्तरार्धाच्या सुरवातीसच केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक किबु व्हिकुना यांनी संघात तीन बदल केले. गॅरी हूपरच्या जागी जॉर्डन मरे याला, सैत्यासेन सिंगच्या जागी सहल अब्दुल समद याला, तर रोहित कुमारच्या जागी जीकसन सिंग याला संधी देण्यात आली. तासाभराच्या खेळानंतर ईस्ट बंगालला आघाडी वाढविण्याची संधी होती, परंतु गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने महंमद रफीकला यशस्वी ठरू दिले नाही. 71व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सने जवळपास बरोबरी साधली होती, पण जॉर्डन मरे याचा ताकदवान फटका ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार याने वेळीच रोखला.

 

दृष्टिक्षेपात...

- आयएसएलच्या सातव्या मोसमात आता 2 स्वयंगोल

- जीकसन सिंग याला आयएसएल स्पर्धेत पहिला गोल

- यंदाच्या स्पर्धेत केरळा ब्लास्टर्स व ईस्ट बंगालवर प्रतिस्पर्ध्यांचे समान 11 गोल

- ईस्ट बंगालचे आयएसएलमध्ये 3, तर केरळा ब्लास्टर्सचे 5 गोल

 
 

संबंधित बातम्या