गोव्याच्या रोनाल्डोस केरळची पसंती!

dainik gomantak
गुरुवार, 7 मे 2020

केरळ ब्लास्टर्सने नव्या मोसमासाठी स्पॅनिश किबु विकुना यांना प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. मोहन बागानचे प्रशिक्षक असताना विकुना यांनी रोनाल्डोस कोलकात्यातील स्पर्धेत खेळताना पाहिले आहे.

पणजी,

गोव्यातील साळगावकर एफसीतर्फे खेळताना कारकीर्द बहरलेल्या रोनाल्डो ऑलिव्हेरा या युवा फुटबॉल आघाडीपटूस इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील केरळा ब्लास्टर्स संघाने पसंती दिली आहे.

गतमोसमात रोनाल्डो ऑलिव्हेरा केरळा ब्लास्टर्सच्या राखीव संघाकडून खेळला, भविष्यात त्याला मोठी संधी शक्य असल्याचे मानले जाते. ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो व पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्याशी नाव सार्धम्य असलेल्या गोव्याच्या युवा आघाडीपटूने अपेक्षा उंचावल्या आहेत.

साळगावकर एफसीकडून गोवा प्रो-लीग स्पर्धेत खेळताना प्रकाशझोतात आलेल्या २२ रोनाल्डोने कोलकात्याच्या ईस्ट बंगाल संघाचे लक्ष वेधले. २०१८-१९ मोसमातील संतोष करंडक राष्ट्रीय स्पर्धेत चमकलेल्या रोनाल्डोस कोलकाताच्या संघाने करारबद्ध केले. ७ डिसेंबर २०१९ रोजी रोनाल्डोने ईस्ट बंगालतर्फे आय-लीग स्पर्धेत प्रतिनिधित्व केले, त्यानंतर मोसमात तो आणखी तीन सामने खेळला. गेल्या फेब्रुवारीत त्याने केरळा ब्लास्टर्सने आपल्या राखीव संघासाठी करारबद्ध केले. आय-लीगच्या द्वितीय विभागीय स्पर्धेत रोनाल्डोने ५ सामन्यांत ४ गोल करून छाप पाडली.

केरळ ब्लास्टर्सने नव्या मोसमासाठी स्पॅनिश किबु विकुना यांना प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. मोहन बागानचे प्रशिक्षक असताना विकुना यांनी रोनाल्डोस कोलकात्यातील स्पर्धेत खेळताना पाहिले आहे. विकुना यांच्या नियोजनात बसल्यास गोमंतकीय जेसेल कार्नेरो याच्याप्रमाणे रोनाल्डोही आयएसएल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सकडून खेळू शकतो.

 

रोनाल्डो ऑलिव्हेराची कारकीर्द

- २०१५-१६ मोसमात साळगावकर एफसीकडून १८ वर्षांखालील आय-लीग स्पर्धेत प्रतिनिधित्व, स्पर्धेत ९ गोल

- २०१७-१८ मोसमात साळगावकर एफसीच्या सीनियर संघात स्थान

-  २०१८-१९ मोसमात गोवा प्रो-लीग स्पर्धेत साळगावकर एफसीकडून खेळताना सर्वाधिक २३ गोल

- २०१८-१९ मधील संतोष करंडक राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोव्याच्या संघात निवड

- २०१९-२० मोसमात ईस्ट बंगालकडून आय-लीग स्पर्धेत पदार्पण

- २०२० मध्ये केरळा ब्लास्टर्सकडून करारबद्ध, राखीव संघात संधी

संबंधित बातम्या