आयपीएल २०२०: पंजाबचे किंग्स दिल्लीवर भारी...

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

पंजाबने आता गुणतक्‍त्यात अव्वल असलेल्या दिल्लीलाही पराभवाचा धक्का देत यंदाच्या आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले.

दुबई- काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा दोन सुपर ओव्हरमध्ये पराभव करणाऱ्या पंजाबने आता गुणतक्‍त्यात अव्वल असलेल्या दिल्लीलाही पराभवाचा धक्का देत यंदाच्या आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले. शिखर धवनने सलग दोन शतकांचा आयपीएलमध्ये विक्रम केला तरीही दिल्लीची हार झाला. 

शतकवीर धवनला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही त्यामुळे दिल्लीला १६४ धावाच करता आल्या यात धवनच्या १०६ धावांचा समावेश आहे. पंजाबने हे आव्हान पाच विकेट आणि एक षटक राखून पार केले. ख्रिस गेलचे १३ चेंडूतील २९ धावांचे वादळ त्यानंतर निकोलस पुरनने दिलेला २८ चेंडूतील ५३ धावांचा तडाखा पंजाबचा विजय सोपा करणारा ठरला.

तुषार फारच महागडा

एरवी केएल राहुल आणि मयांक अगरवाल पंजाबचे तारणहार ठरत होते. पण आज हे दोघेही लवकर बाद झाले. पण गेलने तुषार देशपांडेच्या एकाच षटकात २६ धावा कुटल्या तेथूनच पंजाब मेलने वेग पकडला. त्यानंतर अगरवालला चुकीच्या कॉलमुळे धावचीत करणाऱ्या पुरनने सामना जिंकून देण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि वेगवान अर्धशतक केले त्यामुळे पहिल्या दहा षटकांतच पंजाबचा विजय निश्‍चित झाला होता. अजूनपर्यंत अपयशी ठरणाऱ्या मॅक्‍सवेलनेही निर्णायक योगदान दिले. 

धवनचे शतक तरीही...

धडाकेबाज सलामीवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पृथ्वी शॉचे अपयश कायम राहिले. मुळात गोल्डन डक (सलग दोन सामन्यात शुन्य) केल्यानंतर आज त्याच्या फलंदाजीत आत्मविश्‍वास हरवल्याचे स्पष्ट दिसून येत होते. अवघ्या सात धावांवर तो परतला त्यानंतर येणाऱ्या श्रेयस अय्यर आणि पुनरागमन करणारा रिषभ पंत हे भरवशाचे फलंदाज प्रत्येकी १४ धावांवर परतले. 

शिखर धवन एका बाजूने शतकी खेळी सजवत असताना दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नव्हती. स्टॉयनिसही उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यामुळे दिल्लीच्या गाडीचा वेळ अंतिम षटकांत कमी होत गेला परिणामी धवनने नाबाद १०६ धावा केल्या तरी दिल्लीच्या खात्यात १६४ धावांचीच नोंद झाली. 
 

संबंधित बातम्या