
India vs Australia ODI Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच चार सामन्यांची कसोटी मालिका संपली. या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. आता या कसोटी मालिकेनंतर 17 मार्चपासून या दोन संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
31 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामापूर्वीची ही भारताची अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. दरम्यान, यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणारी वनडे मालिका महत्त्वाची राहणार आहे.
17 ते 22 मार्चदरम्यान होणार असलेल्या या वनडे मालिकेतील तीन सामने अनुक्रमे मुंबई, विशाखापट्टणम आणि चेन्नई येथे होणार आहेत. या तिन्ही सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.
या वनडे मालिकेत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर मुकण्याची शक्यता आहे. तो सध्या पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. तसेच या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार उपलब्ध असणार नाही. त्याच्याऐवजी हार्दिक पंड्या पहिल्या वनडेत भारताचे नेतृत्व करणार आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सही या मालिकेला मुकणार असल्याने त्याच्याऐवजी स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसेल. त्याचबरोबर या मालिकेतून ऑस्ट्रेलियन संघात मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर असे काही प्रमुख खेळाडू पुनरागमन करणार आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आत्तापर्यंत 143 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये 53 सामन्यात भारताने आणि 80 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही. तसेच भारतात या दोन संघात 64 सामने खेळवण्यात आले आहेत, यातील 29 सामने भारताने जिंकले आहेत, तर 30 सामने पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार) (पहिल्या सामन्यासाठी अनुपलब्ध), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) (पहिल्या सामन्यासाठी कर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट
ऑस्ट्रेलिया संघ - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन ऍबॉट, एश्टन एगार, ऍलेक्स कॅरे, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅब्युशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 2023
17 मार्च - पहिला वनडे, मुंबई (वेळ - दु. 1.30 वाजता)
19 मार्च - दुसरा वनडे, विशाखापट्टणम (वेळ - दु. 1.30 वाजता)
22 मार्च - तिसरा वनडे, चेन्नई (वेळ - दु. 1.30 वाजता)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.